
Chhatrapati Sambhajinagar News: राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जागावाटपावरून आता पर्यंत तीन ठिकाणी युती फिस्कटली आहे. पुणे, नवी मुंबई आणि संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेसेनेच्या युतीला तडा गेला आहे. भाजप आणि शिंदे गट स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. पण या सगळ्यातच भाजपला अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक राहिले असताना अनेक इच्छुकांकडून मात्र मोठ्या प्रमाणात नाराजी आणि संपात व्यक्त केला जात आहे. या नाराजांना आवरण्यासाठी अक्षरश: पोलिसांची मदत घ्यावी लागल्याचेही समोर आले आहे.
राज्यात सध्या भाजप प्रणित महायुतीची लाट आहे. राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर भाजपकडे इच्छुकांची गर्दी जमू लागली आहे. तिकीट मिळवण्यासाठी अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. आज उमेदवारी मिळवण्याचा शेवटचा दिवस आहे. पक्षाकडून एबी फॉर्म वाटले जात आहे. पण संभाजीनगरमध्ये मात्र एबी फॉर्मवाटपावरून जोरदार राडा झाल्यचाचे पाहायला मिळाले. मंत्री अतूल सावे यांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्ते, इच्छुकांना एबी फॉर्म मिळालाच नाही. त्यामुळे अतूल सावेंच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत आपला संताप व्यक्त केला. या नाराजांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली.
संभाजीनगरमध्ये तिकीटवाटपावरून मोठा राडा झाला. इच्छुकांनी आपली नाराजी, संताप बोलून दाखवला एका महिलेला अश्रू अनावर झाले. तिकीट मिळाले नाही, म्हणून एका महिलेने अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तात्काळ त्या महिलेला रोखले आणि दुर्घटना टळली. भाजप कार्यकर्त्यांकडून संभाजीनगरमध्ये भाजपविरोधात कार्यकर्त्यांचा मोठा गदारोळ झाला. आम्ही एकनिष्ठ राहिलो, ही आमची चूक झाली का, असा सवालही इच्छुकांकडून पक्ष नेतृत्त्वाला विचारण्यात आला.
BJP-Shinde Shivsena Alliance Split: पुण्यापाठोपाठ नवी मुंबई आणि संभाजीनगरमध्ये भाजप-शिंदेसेनेची युती
छत्रपती संभाजीनगरमध्ये अखेर भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याचे स्पष्ट झाले असून, दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे महापालिका निवडणूक लढवणार आहेत. याबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा केली. पत्रकारांशी बोलताना संजय शिरसाट यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये युती व्हावी, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले. स्थानिक पातळीवरही बैठका घेण्यात आल्या. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका वेगळी असल्याचे दिसून आले. युतीबाबत शंका आधीपासूनच होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून येत असल्याचे चित्र दिसत आहे. अकोल्यात तिकीट न मिळाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट पक्षाच्या निवडणूक प्रभारीच्या निवासस्थानी जाऊन मोठा गोंधळ घातला, तर नाशिकमध्ये एबी फॉर्मच्या वाटपावरून पळवापळवी आणि राडा झाल्याची घटना समोर आली आहे.
अकोल्यात भाजपच्या महिला पदाधिकारी शकुंतला जाधव या अकोटफैल भागातून एससी प्रवर्गातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. मात्र संबंधित वॉर्ड अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने जाधव प्रचंड नाराज झाल्या. तिकीट न मिळाल्याचा जाब विचारण्यासाठी शकुंतला जाधव आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपचे निवडणूक प्रभारी विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी धाव घेतली.
T20 World Cup 2026 : विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली जागा! हा 26 वर्षीय करणार
या वेळी भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गोंधळाच्या दरम्यान शकुंतला जाधव यांचे अश्रू अनावर झाले होते. तणाव वाढत असतानाच त्यांची अचानक तब्येत बिघडली आणि त्या अस्वस्थ अवस्थेत जमिनीवर कोसळल्या. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, नाशिकमध्येही भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. एबी फॉर्मच्या वाटपावरून जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. एबी फॉर्मची पळवापळवी झाल्याचा आरोप होत असून भाजपचे तिन्ही आमदार एकाच गाडीत फॉर्म घेऊन महामार्गावर पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अकोला आणि नाशिकमधील या घटनांमुळे भाजपमधील असंतोष उघडपणे समोर आला असून, उमेदवारी आणि जागावाटपावरून पक्षातील अंतर्गत कलह वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.