वसईकर, कुठे जाऊन बसता तुम्ही? अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी दौरा केला. पहाटेपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात त्यांनी वारजे, आहिरेगाव, धायरी आणि नांदेड सिटी परिसरातील विकासकामांची पाहणी केली. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रुपाली चाकणकर आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
वारजेतील चौधरी चौकापासून दौऱ्याची सुरुवात करताना अजित पवार यांनी वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुर्दशा आणि नागरिकांच्या तक्रारींबाबत माहिती घेतली. नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी व विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
धायरी व नांदेड सिटी परिसरात पाहणीदरम्यान वारजे-शिवणे पुलाच्या उंचीचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यास हा पूल पाण्याखाली जात असल्याने पुलाची उंची वाढवण्याचे आदेश त्यांनी तत्काळ दिले. तसेच धायरी डिपी रोड आणि कात्रज चौक उड्डाणपुलाच्या कामांचा आढावा घेत कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, पाहणीदरम्यान पीएमआरडीएचे एक अधिकारी वेळेवर न आल्याने पवार संतप्त झाले. वसईकर, कुठे जाऊन बसता तुम्ही? असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांना सर्वांसमोर फटकारले.
संग्राम जगताप यांना समज देणार
अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांना यापूर्वी समज देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सुधारणा करतो, असा शब्द दिला होता. मात्र, त्यांच्यात सुधारणा झालेली नाही. ते वारंवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात भूमिका घेत आहेत, त्यामुळे पक्ष त्यांना नोटीस देणार आहे, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात दिली. पुण्यातील वडगांव येथील नवले लॉन्समध्ये शनिवारी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जनसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका व ध्येय धोरण हे सर्व धर्म समभावाचे व सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाण्याचे आहे. अरुणकाका जगताप असताना सर्व काही सुरळीत सुरू होते. ते गेल्यावर मात्र, संग्राम जगताप यांच्या डोक्यावरील वडीलांचे क्षेत्र गेले. त्यानंतर त्यांनी वेगळी भूमिका मांडण्यास सुरूवात केली. ते पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात बोलत असल्याने त्यांना लवकरच नोटीस दिली जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.