पुणे : काल संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला प्रफुल पटेल, नवाब मलिक, छगन भुजबळ, शिवाजीराव गर्जे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित असल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाचे बडे नेते पुण्यात होते. अजित पवार यांच्या पुण्यातील जिजाई निवासस्थानी बैठक झाली असल्याची माहिती आहे. या बैठकीला अजित पवार, प्रफुल पटेल, नवाब मलिक, छगन भुजबळ, सुनील तटकरे, शिवाजीराव गर्जे आणि इतर नेते उपस्थित होते. या बैठकीच्या चर्चेवरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अजित पवार चांगलेच संतापले.
कर्जतमधून अजित पवार लढणार तर जय पवार बारामतीतून लढणार अशी चर्चा आहे. तसंच, काल झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीबद्दल माध्यमांनी अजित पवारांना प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी रात्री झालेल्या बैठकीबाबत बोलणं टाळलं तसंच, प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितलीच पाहिजे असं काही नाही, असं म्हणत उत्तर देणे टाळले आहे.
अजित पवार काय म्हणाले?
प्रत्येक वेळी मुलाखत द्या हे बरोबर नाहीये. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आम्ही आमच्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरुन व्यवस्थित काम करत आहोत. आम्हाला युती टिकवायची आहे. आमच्या पद्धतीने काम सुरू आहे. अजित पवार यांना जेव्हा जय पवार बारामतीतून निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारला असताा त्यांनी म्हटलं आहे की, प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितलीच पाहिजे, असं काही नाही. तुम्ही काही चर्चा कराल त्याला उत्तर द्यायला मी बांधील आहे का?, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.