
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा; रुग्णांचे आरोग्य धोक्यात, सुविधा मिळवण्यासाठी...
अकोला : जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा दिवसेंदिवस अग्रेसर होत असली तरी काही समस्या मात्र अजूनही अधून-मधून डोके वर काढतात. विशेषतः रुग्णांना आवश्यक सुविधा अन् औषधी यांचा यामध्ये समावेश होतो. जिल्ह्यातील औषधांचा तुटवडा जाणवत असून, त्यामुळे रुग्णांना औषधांसाठी धावपळ करावी लागते. तर जिल्ह्यातील प्रमुख शासकीय रुग्णालय असलेले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (जीएमसी) अकोला काही रुग्णांना योग्य त्या सुविधांअभावी अखेर खासगीचाच आधार घ्यावा लागतो.
कधी डॉक्टर तर कधी नर्स, वॉर्डबॉय तर कधी स्ट्रेचर यांची वाणवा जाणवते. तर कधी औषधांचा तुटवडा असतो. जिल्ह्यात सद्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयासह ५ ग्रामीण रुग्णालय, ३१ प्राथमिक आरोग्य केंद्र व १७६ उपकेंद्र कार्यरत आहेत. यापैकी शहराच्या ठिकाणी स्थिती ठिकठाक असली तरी अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा असल्याची ओरड नेहमीच कानावर येते. काही औषधी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध होत असून काहींसाठी रुग्णांना खासगीचाच आधार घ्यावा लागतो.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा; रुग्णांचे आरोग्य धोक्यात
दरम्यान, जिल्हा रुग्णालयातही ही समस्या अधूनमधून समोर येत असून, औषधांच्या तुटवड्याने चांगलेच त्रस्त होतात. अखेर त्यांना औषधांसाठी खासगीचाच आधार घ्यावा लागतो. तर अनेकदा तज्ञ डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय उपलब्ध होत नसल्याच्याही तक्रारी समोर येतात.
अँटी रेबीज, अँटी व्हेनमचा पुरेसा साठा
जिल्ह्यात ३१ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटी रेबीज व अॅटी व्हेनम लसींचा सद्यस्थितीत पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर ५५३ अॅटी रेबिजच्या तर २ हजार ५२८ अॅटी व्हेनमच्या लसी उपलब्ध आहेत.
ग्रामीणमध्ये ‘रेफर टू अकोला’
ग्रामीण भागातील माता मृत्यूचे प्रमाण कमी करणे, नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरवण्यावर एकीकडे शासन प्रयत्नशील असताना जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयातून अनेकदा रुग्णांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सर्व काही उपकरणे सुविधा उपलब्ध असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना रेफर टू अकोलाचा रोग जडला आहे. काही ठिकाणी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालयात मिळत नसल्याने उपकरणे पडून असल्याचे दिसून येते.
औषधांसह लसींचा पुरेसा साठा उपलब्ध
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांसह लसींचा पुरेसा साठा आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एचपीव्ही (ह्युमन पेंपिलोमा व्हायरस व्हॅक्सिन) लस १४ ते १५ वयोगटातील मुलींना देण्यात येत असून, त्याविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती देखील सुरु आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
– विनोद करंजीकर, माता व बालसंगोपन