
शहा विरुद्ध गारटकर काट्याची टक्कर निश्चित; इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक होणार रंगतदार
इंदापूर : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी तीव्र विरोध दर्शवूनही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी दिली आहे. शहा यांनी शनिवारी (दि.१५) स्थानिक नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी शहा यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला होता. “शहा यांना पक्षात घ्या, पण नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊ नये,” अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. एवढेच नव्हे तर “पक्षाने आमची भूमिका मान्य केली नाही, तर आम्हालाही वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा त्यांनी इशारा दिला होता. अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाकरिता शहा यांनी अर्ज दाखल केला असून, एकंदीत चित्र स्पष्ट झाले आहे. शहा विरुद्ध गारटकर अशी थरारक आणि काट्याची टक्कर निश्चित झाली आहे.
भरत शहा यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर मागाडे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रमेश ढगे यांनी स्वीकारला. अर्ज दाखल करताना शहा यांचे बंधू मुकुंद शहा, माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, बाळासाहेब ढवळे, माजी गटनेते गजानन गवळी आणि माजी नगरसेवक स्वप्निल राऊत हे उपस्थित होते. शहा यांच्या उमेदवारीसोबत दाखल झालेल्या या उपस्थितीनेही त्यांच्या राजकीय ताकदीची स्पष्ट झलक मिळाली.
इंदापूरच्या निवडणुकीची इतिहासात नोंद राहील
यापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे महादेव वसंत सोमवंशी यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. एकीकडे पक्षांतर्गत झालेल्या वळणांमुळे आणि दुसरीकडे शहा–गारटकर आमनेसामने आल्याने इंदापूरची निवडणूक इतिहासात नोंद राहील अशी रोमहर्षक होण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या दोन्ही पक्षांकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून २, कृष्णा–भीमा विकास आघाडीकडून १ आणि अपक्ष उमेदवारांकडून ३ अर्ज दाखल झाले आहेत.
प्रभागनिहाय अर्ज दाखल
प्रभाग ९-ब (सर्वसाधारण) – शैलेश देविदास पवार (राष्ट्रवादी काँग्रेस). प्रभाग ७-ब (सर्वसाधारण) – मयुरी प्रशांत उंबरे (राष्ट्रवादी काँग्रेस). प्रभाग २-ब (सर्वसाधारण) – गणेश तानाजी देवकर (अपक्ष).
प्रभाग १०-ब (सर्वसाधारण) – रोहित भागवत ढावरे (अपक्ष). प्रभाग ६-अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) – संतोष प्रभाकर ढोले यांनी कृष्णा–भीमा विकास आघाडीकडून तसेच अपक्ष या दोन्ही प्रकारे अर्ज दाखल केला आहे.