स्थानिक नेतृत्व व कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच युती; अजित पवारांचे सूचक विधान
पुणे, शहर प्रतिनिधी : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत विशेषतः महापालिका निवडणुकीत प्रभाग रचना कशी ही असली तरी, ती स्वीकारण्याची मानसिकता आपण स्वीकारली पाहिजे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी करतानाच, स्थानिक नेतृत्व व कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती केली जाईल, अन्यथा त्यांच्या मतानुसार निवडणुकीला सामोरे जाऊ असे स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) २६ वा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात साजरा झाला. सोहळ्याच्या समारोप प्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्यध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक , खासदार सुनेत्रा पवार, प्रदेश सरचिटणीस व कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, मंत्री आदिती तटकरे, आमदार चेतन तुपे, आण्णा बनसोडे, प्रमुख प्रवक्ते आनंद परांजपे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, धीरज शर्मा, सुरेश घुले, योगेश बहेल, राजलक्ष्मी भोसले, माजी आमदार सुनील टिंगरे, सुभाष जगताप, प्रदीप गाराटकर, माजी आमदार विलास लांडे, सुभाष जगताप, प्रदीप देशमुख, प्रमोद हिंदुराव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत २८ महापालिका, २५ जिल्हा परिषद, २८५ पंचायत समितीच्या तसेच नगरपालिका व नगरपरिषद यांच्या निवडणुका होत आहेत. यात पक्षाकडून तरुण तरुणींना तसेच महिलांना अधिकाधिक संधी दिली जाणार आहे. मुबंई मध्ये एकचा प्रभाग तर अन्यत्र ४ चा प्रभाग असणार आहे. आता काहींचे मतप्रवाह वेगळे असतील पण आहे ती प्रभाग परिस्थिती आपण स्वीकारली पाहिजे असेही ते म्हणाले. राज्यात नव्याने १ कोटी सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले असून पुण्यात दहा लाख व अन्य मोठ्या जिल्ह्यात पाच लाख सदस्य या चार महिन्यात नोंदविण्यसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. दरम्यान महायुती राज्यात सत्तेत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असा शब्द पवार यांनी यावेळी दिला.
पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यात जेथे शक्य आहे तेथे युती म्हणून सामोरे जाऊ. पण जेथे शक्य नाही तेथे स्वबळावर व ताकतीने निवडणूक लढू असे सांगितले. पक्ष मोठा झाला तर आपण मोठे होणार आहोत. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होतानाच पहिल्या दिवसापासूनच सांगितले की, आम्ही आमची विचारधारणा सोडणार नाही हे सांगितले. अल्पसंख्याक, आदिवासी, ओबीसी समाजाला निवडणुकीत संधी दिली व ती कायम ठेवणार आहोत. आपण सत्तेचा फायदा हा जनतेच्या हितासाठी करत आहोत असेही ते म्हणाले.
ईशा देओलने मुलीच्या वाढदिवशी केला प्रेमाचा वर्षाव, कपाळावर किस घेत शेअर केला क्युट फोटो!
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत महायुती ला केवळ १७ जागा मिळाल्या. पण विधानसभा निवडणुकीत आपल्याला २८८ पौकी २३७ जागा मिळाल्या. शेतकरी व लाडक्या बहिणीने आम्हाला भरभरून मतदान केले. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपण महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत. पण जेथे शक्य नाही तेथे स्वतंत्र लढणार आहोत. अशावेळी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस हाच सर्वाधिक विजय मिळवणारा पक्ष राहू असे काम कार्यकर्त्यांनी करावे व हा संकल्प घेऊन, पक्षाच्या सदस्य नोंदींचा आकडा हा १ कोटीच्या वर न्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
सुनील तटकरे यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपेक्षित यश मिळाले नाही तेव्हा अजित पवार यांच्यावर टीका झाली पण मला विश्वास होता की विधानसभा निवडणुकीत यश मोठे मिळणार व ते मिळाले. आता गेली आठ वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळे चार महिन्यानंतर येणाऱ्या या निवडणुकीला आपल्याला मोठ्या ताकदीने सामोरे जायचे आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्याला मोठे यश मिळाले असून, आता एक नवीन ऊर्जा घेऊन आपल्याला काम करायचे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा महायुतीच्या नियमांना बाधा न आणता आपल्याला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या, अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्हा महिलांना ताकद व आत्मविश्वास दिला असल्याचे सांगितले. यावेळी सिने अभिनेते सयाजी शिनेडे, माजी मंत्री संजय बनसोडे, नरहरी हिरवळ आदींची भाषणे झाली.
प्रमुख घडामोडी व लक्षवेधी