युएफा नेशन्स लीग २०२५(फोटो-सोशल मीडिया)
Nations League 2025 : रविवारचा दिवस क्रीडा रसिकांसाठी रोमांचक राहिला. एकिकडे कार्लोस अल्काराजने साडेपाच तासांच्या लढतीनंतर फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकले. यानंतरच काही वेळातच ४० वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने युएफा नेशन्स लीग २०२५ स्पर्धेचे विजेतेपद नावावर केले. अत्यंत रोमांचक झालेल्या नेशन्स लीगच्या अंतिम सामन्यात पोर्तुगालने स्पेनला पेनल्टी शूट आऊटमध्ये ५-३ अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला. ही रोनाल्डोच्या कारकिर्दीतील तिसरी आंतरराष्ट्रीय ट्रॉफी आहे.
रोनाल्डोने यापूर्वी २०१६ साली युरो कप आणि २०१९ मध्ये नेशन्स लीग स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे यंदाचे रोनाल्डोचे हे दुसरे नेशन्स लीग विजेतेपद आहे. पोर्तुगालने विजेतेपद जिंकल्यानंतर रोनाल्डोला अश्रुही अनावर झाले होते. रोनाल्डो जिंकल्यानंतर म्हणाला, मी माझ्या क्लबसाठी अनेक विजेतेपदं जिंकली आहेत. पण पोर्तुगालसाठी जिंकण्यापेक्षा मोठे काही नाही. हे अश्रु मोहिम फत्ते झाल्याबद्दल आणि अत्यंत आनंदाचे आहेत.
अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये काट्याची टक्कर होती. पण त्यातही सर्वांचे लक्ष होते की ख्रिस्तियानो रोनाल्डो विरुद्ध लामिन यमाल या दोन खेळाडूंमधील लढतीकडेही. एकीकडे सर्वात यशस्वी फुटबॉलपटू, तर दुसरीकडे फुटबॉलच्या जगतातील उभारता तारा अशी ही टक्कर होती. पण यात अनुभवी रोनाल्डो आणि त्याचा संघ यमाल आणि स्पेनला शेवटी वरचढ ठरला.
अंतिम सामन्यात पहिला गोल स्पेनसाठी मार्टिन झुबीमेंडीने २१ व्या मिनिटाला केला. पण स्पेनला ही आघाडी फार काळ टिकवता आली नाही, कारण पोर्तुगालकडून पाचच मिनिटात नुनो मेंडेसने सामन्याच्या २६ मिनिटाला गोल करत बरोबरी साधून दिली. पहिला हाफ संपण्याच्या अखेरीस स्पेनसाठी मिकेल ओयार्झबालने ४५ व्या मिनिटाला गोल करत स्पेनला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. नंतर दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी सुरुवातीला तगडी लढत दिली. यावेळी
पोर्तुगालसाठी रोनाल्डो तारणहार ठरला. त्याने ६१ व्या मिनिटाला गोल करत सामन्यात २-२ अशी बरोबरी पोर्तुगालला करून दिली. नंतर दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. अतिरिक्त वेळेतही गोल झाला नाही. त्यामुळे पेनल्टी शूटआऊट घेण्यात आले. पण यावेळी रोनाल्डो आधीच ८८ व्या मिनिटाला स्थायुंमध्ये ताण आल्याने मैदानातून बाहेर गेला होता. त्यामुळे तो पेनल्टी शूटआऊटमध्ये भाग घेऊ शकला नाही. पेनल्टी शूटआऊटमध्ये पोर्तुगालने सहज ५-३ असा विजय मिळवला आणि विजेतेपदावर नाव कोरले.
हेही वाचा : IPL 2025 : RCB संघ विकला जाणार? आयपीएलच्या इतिहासात कधी नव्हे होणार महागडा करार, वाचा सविस्तर..
रोनाल्डोने या सामन्यात १३८ वा आंतरराष्ट्रीय गोल केला. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा आहे. सध्या सक्रिय खेळाडूंमध्ये त्याच्या पोठापाठ लिओनल मेस्सी (११२) आणि सुनील छेत्री (९५) आहेत.