
Jalgaon News: ज्वारी खरेदीला ब्रेक! चार दिवसांपासून केंद्र बंद (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
अमळनेर तालुक्यात ज्वारी खरेदीसाठी फुटसेल सोसायटीला परवानगी देण्यात आली आहे. या खरेदीसाठी मे महिन्यापासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू होती. सुरुवातीला मोठ्या संख्येने शेतकरी एकाच वेळी नोंदणीसाठी आल्याने रजिस्टरवर नावे नोंदवण्यात आली. त्यानंतर ऑनलाइन नोंदणी करताना काही क्रमांक पुढे-मागे झाल्याचे समोर आले.
यामुळे नोंदणीतील क्रम आणि प्रत्यक्ष खरेदीच्या क्रमात तफावत निर्माण झाली. उदाहरणार्थ, ज्याचा नंबर ३०० असायला हवा होता, तो ऑनलाइन प्रक्रियेत ९०० व्या क्रमांकावर गेल्याचे सांगण्यात येत आहे. या गोंधळामुळे काही शेतकऱ्यांचा माल विकला गेल्यानंतर त्यांच्याच नावावर व्यापाऱ्यांचा माल खरेदी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. Jalgaon News:
शुक्रवारपासून ज्वारीची खरेदी बंद असल्याने बाजारात माल घेऊन आलेली वाहने अडकून पडली आहेत. सध्या सुमारे १९ ट्रॅक्टर रांगेत उभे असल्याची माहिती आहे. अनेक शेतकरी वाहने भाड्याने घेऊन ज्वारी विकण्यासाठी आले आहेत. मात्र खरेदी बंद असल्याने गेल्या चार दिवसांचा वाहनभाड्याचा अतिरिक्त खर्च त्यांच्या खिशातून जात आहे. खरेदी पुन्हा कधी सुरू होणार, याबाबत स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वाहनभाड्याचा आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडत असल्याने ही रक्कम फुटसेल सोसायटीने द्यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा मार्केटिंग अधिकारी सुनील मेने यांनी खरेदी केंद्राला भेट दिली. त्यांनी फुटसेल सोसायटीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती समजून घेतली. यावेळी पोलिस निरीक्षक दत्तात्र्य निकम यांनाही बोलावण्यात आले. नोंदणीतील नियमानुसार ज्याचा क्रमांक असेल, त्याच शेतकऱ्याचा माल मोजला जाईल, असे मेने यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून खरेदीचे उद्दिष्ट आणखी दोन हजार क्विंटलने वाढवून देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. मात्र नोंदणी प्रक्रियेत जाणीवपूर्वक किंवा नियमबाह्य पद्धतीने गोंधळ करण्यात आला असल्याचे तपासात आढळल्यास फुटसेल सोसायटीविरोधात कारवाईचा अहवाल पाठवण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
Sugar Price Drop : सणासुदीच्या दिवसांत जळगावकरांना दिलासा! प्रतिकिलो …
नोंदणीचा प्रश्न सुरू असतानाच ज्वारी खरेदीच्या प्रक्रियेत आणखी एक अडथळा निर्माण झाला आहे. ज्वारीची गुणवत्ता तपासणारे ग्रेडर सुभाष पाटील आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा मोबाइलही बंद असल्याने संपर्क होऊ शकलेला नाही. नियमानुसार जुना ग्रेडर प्रत्यक्ष केंद्रावर येऊन परिस्थितीचा आढावा दिल्यानंतरच नवीन ग्रेडरकडून खरेदी सुरू करता येते. त्यामुळे ग्रेडरच्या अनुपस्थितीमुळेही प्रक्रिया रखडली आहे. एकीकडे नोंदणीतील क्रमांकाचा वाद आणि दुसरीकडे ग्रेडरची अडचण यामुळे ज्वारी खरेदी केंद्रावर दुहेरी कोंडी निर्माण झाली आहे. माल घेऊन अनेक दिवसांपासून थांबलेल्या शेतकऱ्यांना आता खरेदी लवकर सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
Jalgaon News: जवानांच्या मनगटावर बांधला जाणार अभिमानाचा धागा …