(Photo - Social Media)
Amit Shah UCC Statement : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत देशभरात आता ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येणार आहे. तब्बल एक महिना चालणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून विविध विकासकामं हाती घेतली जाणार असून, केंद्रातील एनडीए सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांची माहितीही जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत या अभियानाची घोषणा केली.
यावेळी अमित शाह यांनी समान नागरी कायद्याबाबतही मोठं वक्तव्य केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, एनडीएच्या सत्तेत असलेल्या 21 राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने पावलं उचलली जातील. तसेच 2029 पर्यंत UCC बाबत निर्णय घेतला जाईल, असं शाह यांनी सांगितलं.
‘सेवा संकल्प अभियानाअंतर्गत तब्बल 12 कलमी कार्यक्रम राबवला जाणार आहे. यामध्ये रक्तदान, ‘आभार’, ‘नमो सेवा’, संगीत-नाट्यमय सादरीकरण, अंगणवाडी सेवा यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. याशिवाय ‘सेवा ज्योती कलश यात्रा’, वाडनगर ते वाराणसी यात्रा आणि वाराणसी ते वाडनगर यात्रेचंही आयोजन केलं जाणार आहे.
सरकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सेवा सेतू अभियान’ राबवलं जाणार आहे. ब्लॉक आणि तालुका स्तरावर सरकारी योजना पोहोचवण्यावरही विशेष भर दिला जाणार असल्याचं शाह यांनी सांगितलं.
दरम्यान, अमित शाह यांनी मोदी सरकारच्या काळातील विविध निर्णय आणि कामांचा उल्लेख केला. कलम 370 रद्द करणं, अयोध्येतील राम मंदिराची उभारणी आणि चांद्रयान-3 यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. त्याचबरोबर देशातील रेल्वे व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण करण्यात आल्याचंही शाह म्हणाले.
याशिवाय देशातील घुसखोरांचा मुद्दाही शाह यांनी उपस्थित केला. देशातील एकएक घुसखोराला बाहेर काढू, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
एकूणच, मोदींच्या वाढदिवसानिमित्त जाहीर करण्यात आलेलं सेवा संकल्प अभियान आणि UCC बाबत अमित शाहांनी केलेलं वक्तव्य यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.






