
महाविकास आघाडीची भाकरी भाजणार की करपणार! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात
एका बाजूला शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात संभाव्य युतीची चर्चा सुरू असल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. काँग्रेस पक्षाने मात्र शिवसेनेने मनसेला सोबत घेतल्यास शिवसेनेसह आघाडीत सहभागी होणार नसल्याचे संकेत दिल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची एकजूट टिकेल की तडे जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) च्या पुणे शहर नेतृत्वाने स्पष्ट भूमिका मांडत अजित पवार गटासोबत जाण्याचा प्रश्न नाही असे पूर्वी सांगितले होते, मात्र जिल्हानिहाय प्रदेशाध्यक्षांनी घेतलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत वेगळेच चित्र समोर आले आहे. या बैठकीत पदाधिकाऱ्यांचे दोन स्पष्ट मतप्रवाह दिसून आले. एक गट महाविकास आघाडीसोबत ठामपणे जाण्याच्या भूमिकेत असून, दुसरा गट अजित पवार गटासोबत आघाडी करण्यास अनुकूल असल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर पक्षाने तात्काळ अंतिम निर्णय न घेता प्रभागनिहाय अभ्यास करण्याचे निर्देश कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. कोणत्या प्रभागात कोणत्या आघाडीचा अधिक फायदा होईल, स्थानिक राजकीय गणिते, उमेदवारांची ताकद आणि मतदारांचा कल यांचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर मतदानाद्वारे भूमिका ठरवून अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
दुसरीकडे, प्रदेश पातळीवरील नेतृत्वानेही या चर्चांना दुजोरा देत स्पष्ट केले आहे की अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय हा केवळ पुणे किंवा पिंपरी-चिंचवडपुरता मर्यादित नाही. हा निर्णय पक्षाच्या व्यापक धोरणात्मक आणि राजकीय भूमिकेचा भाग असून तो केवळ वरिष्ठ पातळीवरच घेतला जाईल. तसेच मित्र पक्ष काय भूमिका घेतात, याबाबतही सविस्तर चर्चा करावी लागेल, असेही त्यांनी सूचित केले.
एकंदरीतच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) कोणत्या दिशेने जाणार, यावर पुण्यातील महाविकास आघाडीचे राजकारण अवलंबून आहे. पुण्यात महाविकास आघाडीची भाकरी भाजली जाणार की करपणार हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार असून, त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आज पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. इथून पुढे सातत्याने बैठका होतील असे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्याकडून सांगण्यात आले. पुढील काळात कसे समोर जायचे, प्रभाग निहाय आढावा घ्यायचा, की इतर मार्गांचा अवलंब करायचा या सदर्भात चर्चा झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.