
Political News : पुण्यात सुरेंद्र पठारेंच्या प्रवेशामुळे संघटनात्मक पातळीवर मिळणार बळ
पुणे : महानगरपालिका निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून सत्ताधारी पक्षात प्रवेश केला जात आहे. असे असताना पुणे शहराच्या पूर्व भागातील प्रभावी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या सुरेंद्र पठारे यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सुरेंद्र पठारे यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांना संघटनात्मक पातळीवर अधिक बळ मिळणार असून, पूर्व पुण्यात भाजपची पकड आणखी मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुका आणि पुण्याच्या विकासात्मक राजकारणात सुरेंद्र पठारे यांची भूमिका निर्णायक ठरू शकते, असेही काही राजकीय जाणकार लोकांना वाटते. सुरेंद्र पठारे यांच्या पक्षप्रवेशामुळे पुण्यातील ‘टीम देवेंद्र’ अधिक मजबूत झाली असल्याचे चित्र आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टीचे आणि विकासाभिमुख नेते म्हणून ओळखले जातात. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच त्यांनी पुण्यात तब्बल ३००० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले होते.
हेदेखील वाचा : ‘भाजपला कधी मिळाले नाही तेवढं यश नगरपरिषद निवडणुकीत मिळणार’; चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास
यावेळी त्यांनी पुणे हे केवळ सांस्कृतिकच नव्हे तर टेक्नोसेवी शहर असून, आगामी काळात जागतिक पातळीवर दैदिप्यमान कामगिरी करण्याची पुण्याची क्षमता अधोरेखित केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘भविष्यातील पुणे’ प्रत्यक्षात उतरवायचे असेल, तर त्यांना व्हिजन असणाऱ्या नेत्यांची आणि अभ्यासू कार्यकर्त्यांची गरज आहे. त्या दृष्टीने सुरेंद्र पठारे हे भाजपसाठी महत्त्वाची ताकद ठरू शकतात, असे म्हटलं जात आहे.
वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांचा विजय झाला होता. त्यांच्या या विजयात सुरेंद्र पठारे यांचा मोलाचा वाटा राहिला होता. त्या विधानसभा निवडणुकीत सुरेंद्र पठारे यांनी ज्या पद्धतीने प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती, त्यातूनच त्यांची संघटनात्मक क्षमता, नियोजनशक्ती आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जमिनीवर काम करण्याची हातोटी स्पष्टपणे दिसून आली होती. त्या निवडणुकीपासूनच भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांचे लक्ष सुरेंद्र पठारे यांच्या कामगिरीकडे वेधले गेले होते. तेव्हापासून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने सुरू होत्या. शेवटी त्याचाच परिपाक म्हणून आज त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला, असे म्हणता येईल.
सुरेंद्र पठारे हे केवळ राजकीयच नव्हे, तर शैक्षणिकदृष्ट्याही भक्कम पार्श्वभूमी असलेले नेते आहेत. पुण्यातील सीईओपी महाविद्यालयातून त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून, ते त्या काळातील गोल्ड मेडलिस्ट राहिले आहेत. विकासाची चाहूल लागलेल्या लोहगाव, वाघोली, खराडी, चंदननगर परिसराचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. यापूर्वी त्यांनी अर्बन डेव्हलपमेंट, पब्लिक ट्रान्सपोर्ट यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर कार्यक्रम आणि चर्चासत्रांचे आयोजन केले होते, ज्याला पूर्व पुण्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.