
आता उमेदवार यादीची प्रतीक्षा, उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी
भाजपने प्रत्येक प्रभागात काेण निवडुन येऊ शकते याचा सर्व्हे देखील केला आहे. या पार्श्वभुमीवर भाजपची उमेदवारी यादी तयार झाल्याची चर्चा आहे. भाजपमध्ये इच्छुकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी माेर्चेबांधणी सुरु केली आहे. काेअर कमिटीमधील नेत्यांची भेट घेण्यासाठी धावपळ सुरु केली आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने भाजपकडून त्यांच्याकडील ‘ए प्लस’ मधील प्रभागातील उमेदवारांची यादी प्रथम जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
निवडणुकीसाठी इच्छुकांनी गेल्या वर्षापासून जाेरदार तयारी सुरु केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी धार्मिक स्थळांच्या सहली, महिलांकरीता बक्षीसे असणारे ‘हाेम मिनिस्टर’ सारखे कार्यक्रमांचे आयाेजन, विविध प्रकारचे सामाजिक, आराेग्यदायी उपक्रमांचे आयाेजन त्यांच्याकडून केले गेले. माेठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला असुन, प्रत्यक्ष निवडणुकीत पैसा खर्च करण्याची तयारी इच्छुकांनी केली आहे. यामुळे आता उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरु झाला आहे.
भाजपमध्ये इन्कमिंग कधी हाेणार ?
गेल्या काही दिवसापासून भाजपमधील इन्कमिंगमुळे वातावरण तापले आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्याविषयी नाराजी व्यक्त झाली हाेती. इतर पक्षातील बावीसहून अधिक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यामुळे मुळच्या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. संभाव्य पक्षप्रवेशाच्या पार्श्वभुमीवर भाजपकडून अशा प्रभागातील उमेदवारांची यादी उशिरा जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडी नाराजांना गळाला लावणार ?
भाजपमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याने तेथे उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांना महाविकास आघाडीकडून गळाला लावले जाण्याची शक्यता आहे. तसेच उमेदवारी नाकारलेल्यांकडून इतर पक्षांत प्रवेश करण्याच्या दृष्टीने प्रयत्न, चाचपणी आणि हालचाली सुरु केल्या आहेत. विशेषत: महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पक्षांतर हाेण्याची शक्यता अधिक आहे.