एकतर्फी नाहीच... चुरशीचीच! सर्वे करणाऱ्या संस्थांचा ʻचिंचवडʼबाबत धक्कादायक अंदाज
पुणे/ दीपक मुनोत : आमचा उमेदवार किमान एक लाख मताधिक्क्याने विजयी होणार असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा सुरवातीचा अंदाज तर सामान्य नागरीकही ७० हजाराचे मताधिक्क्य सांगत होते. मात्र मतदान संपता संपता हा आकडा थेट ५- १० हजारावर आला आहे. असे धक्कादायक निरीक्षण, चिंचवड मतदारसंघाबाबत, एका खासगी सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने नोंदवला आहे. बरं ही संस्था साधीसुधी नाही तर गत लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी वस्तुनिष्ठ अंदाज वर्तवणारी आहे. सुरवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक अंतिम टप्प्यात चुरशीची झाली. राज्यात अनेक ठिकाणी असे धक्कादायक बदल झाल्याचे संस्थेला दिसून येत आहे.
बदलत्या जमान्यात निवडणूक लढवण्याची आयुधही बदलली आहेत. त्यानुसार, गेल्या काही वर्षात मतदारांचे सर्वेक्षण करणाऱ्या खासगी संस्थांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. निवडणुकीच्या आधी अगदी वर्षभरापासून अशा संस्थांचा आधार विविध पक्ष तसेच इच्छुकांकडून घेण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित संस्थेकडून जबर फी देखील आकारण्यात येते. काही उमेदवारांनी अधिकृत उमेदवारी मिळवल्यानंतरही काही दिवसांसाठी अशा संस्थांचा आधार घेतला आहे.
संबंधित संस्था सर्वेच्या आधारे त्या भागातील समस्या, ज्वलंत प्रश्न तसेच विरोधी पक्ष किंवा उमेदवारांचे कच्चे, पक्के दुवे यांची माहिती आपल्या क्लायंटला देतात आणि त्या आधारे त्यास रणनिती आखण्यास मदत करतात.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एखाद्या मतदारसंघातील रजकीय वातावरण किती वेगाने बदलते याची प्रचिती, असे सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेला आली. त्याचे उदाहरण म्हणजे चिंचवड मतदारसंघ होय. या मतदारसंघात, उमेदवारीवरून भाजपमध्ये सुरवातीला दीर – भावजयीचा वाद गाजला. तो मिटताच, समोर कोणीही येवो शंकर जगताप हे प्रचंड मतांनी विजयी होणार, मतदान ही केवळ औपचारिकताच, असे बोलले जाऊ लागले. सुमारे साडेसहा लाख मतदार असल्याने, मताधिक्क्याचा आकडाही १ लाख ते ७० हजार सांगण्यात येऊ लागला.
अर्थात, विरोधी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल कलाटे यांना मुळात उमेदवारी मिळाली अगदी अर्ज दाखल करण्यापुर्वी. त्यामुळे प्रचाराला वेळ अवघा १४/१५ दिवसांचा. या विपरित परिस्थितीत, सुरवातीला खुपच मागे पडलेल्या कलाटे यांचा मोठा पराभवच होणार, असे चित्र होते. मात्र जसजसा मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला तसतसे वातावरण बदलत गेल्याचे चित्र, सर्वेक्षणात वेळोवेळी दिसून आले. आता, मतदान झाल्यानंतर चित्र असे आहे की, कोणाचाही विजय ५ ते १५ हजाराच्या फरकाने होऊ शकतो. येथपर्यंतचे निरीक्षण या सर्वेक्षण संस्थेला आढळून आले आहे.
बदल कसा झाला?
जगताप हे सांगवी, नवी-जुनी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या भागात खूप बळकट. नेमका तेथेच कलाटे यांनी ʻवेगवेगळया प्रकारेʼ जोर लावला. असंतुष्टांनीही रसद पुरवली. इतकेच नव्हे तर, वाकड, काळेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी करून पुर्वतयारी केली, ती देखील फळाला येतांना दिसत आहे.
शरद पवारांच्या रॅलीने बदल
सुरवातीला खूपच मागे पडलेल्या कलाटे यांना शरद पवार यांच्या रॅलीने मोठाच हात दिला व प्रचाराने जोर पकडला. तशातच साथ मिळाली खासदार अमोल कोल्हेंच्या मुलूख मैदानी तोफेची, त्यांच्या भावनिक आवाहनाची. परिणामी वातावरण फिरवण्यात कलाटे यांना यश आल्याचे, निरीक्षण या संस्थेने नोंदवले आहे.
हे सुद्धा वाचा : कमळ खुलणार की, तुतारी वाजणार? ‘या’ मतदारसंघात लाखो रुपयांच्या पैजा
अजित पवार, वळसेंना दिलासा
राज्यातील सत्तांतरानंतर बारामतीत अजित पवार आणि आंबेगावमध्ये दिलीप वळसेंचे काय होणार, याची मोठी उत्सुकता आहे. संबंधित संस्थेने दोघांच्या बाजूने कल दर्शवला आहे. त्यामुळे दोघांच्याही समर्थकांना दिलासा मिळाला आहे.