सौजन्य - नवराष्ट्र टीम
इचलकरंजी/राजेंद्र पाटील : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी विजयी होणार की नविन इतिहास घडणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता आपलाच नेता कसा निवडून येणार याचा दावा करत गोळा-बेरीज करण्यात गुंतला आहे. गत महिनाभर मतदारसंघात घडलेल्या घडामोडी पाहता पुन्हा कमळ खुलणार की महाविकास आघाडीच्या विजयाची तुतारी वाजणार ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे -महायुती, मदन कारंडे – महाविकास आघाडी, विठ्ठल चोपडे -अपक्ष, अमर शिंदे – बहुजन समाज पार्टी, रवि गोंदकर – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रशांत गंगावणे – देश जनहित पार्टी, सचिन बेलेकर – राष्ट्रीय समाज पक्ष, शमशुद्दीन मोमीन – वंचित बहुजन आघाडी, अभिषेक पाटील – अपक्ष, मदन येताळा कारंडे – अपक्ष, रावसो निर्मळे – अपक्ष, शाहूगोंडा सातगोंडा पाटील – अपक्ष, सॅम उर्फ सचिन आठवले – अपक्ष यांचा समावेश आहे.
सर्व उमेदवारांचे नशिब बुधवारी (दि. २०) इव्हीएम मशिनमध्ये बंद झाले. मतदाराजा कोणाला पास करणार हे शनिवारी (दि. २३) कळणार आहे. बुधवारी संध्याकाळी मतदानाची वेळ संपल्यापासून तर्क वितर्कांना ऊत आला आहे. माझाच नेता कसा जिंकणार यावरुन जेवणापासून ते लाखो रुपयांच्या पैजा लावल्या जात आहेत. काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दाखविलेला स्वयंस्फूर्ती उत्साह या विधानसभा निवडणूकीतही दिसून आला. परंतु अनेक मतदान केंद्रावर अखेरच्या सत्रात लक्ष्मी दर्शन घडविल्यानंतरच मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. मतदानाची वेळ संपल्यानंतर देखील रात्री उशिरापर्यंत अनेक मतदान केंद्रावर मतदान सुरू होते.
सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांच्यात निर्माण झालेली इर्षा, निवडणुक विभागामार्फत राबवलेली जनजागृती, सोशल मिडीयावरून झळकलेले विविध संदेश आदींच्या प्रभावामुळे टक्केवारी वाढेल, अशी अपेक्षा होती. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणूकीपेक्षा काही टक्क्याने मताची आकडेवारी वाढली. मागील दहा वर्षाच्या निवडणुकीची गणिते पाहता यंदाची निवडणूक थोडी वेगळी आहे. काँग्रेस, अपक्ष त्यानंतर भाजप अशी तीन प्रकारची झेंडे हाती घेतल्यानंतरची ही निवडणूक इचलकरंजीच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी देणारी ठरणारी आहे.
आकडेवारीवरून बांधले जातायेत आडाखे
२०१९ साली ६८.२ इतकी टक्केवारी होती. चालू वेळी ६८.९५ इतके मतदान झाले. मागील आणि आताची निवडणूक या दोहोतील आकडेवारीवरून विजयाचे आडाखे बांधले जात आहेत. २००९ साली झालेल्या निवडणूकीत सुरेश हाळवणकर यांना ९० हजार १०४ आणि प्रकाश आवाडे यांना ६६ हजार ८६७ मते मिळाली होती. त्यामध्ये हाळवणकर २३ हजार १३७ मतांनी विजयी झाले होते. तर २०१४ च्या निवडणूकीत सुरेश हाळवणकर यांना ९४ हजार २१४ आणि प्रकाश आवाडे यांना ७८ हजार ९८९ इतकी मते मिळाली होती. त्यामध्ये सुरेश हाळवणकर १५ हजार २२५ इतक्या मतांनी विजयी झाले होते.
राहुल आवाडे पहिल्यांदाच रिंगणात
मागील निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्याने पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाला राहुल खंजिरे यांच्या रुपात नवा चेहरा लाभला होता. काँग्रेस म्हणजेच आवाडे आणि आवाडे म्हणजेच काँग्रेस असे समीकरण गेल्या चार दशकापासून या मतदारसंघात होते. त्यामुळे आवाडेंना निवडणूक अडचणीची ठरेल, अशी शक्यता व्यक्त केली जात असताना ते अपक्ष निवडणूक लढवून विजयी झाले. यंदाच्या निवडणूकीत पहिल्यांदाच भाजपच्या चिन्हावर राहुल आवाडे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. भाजपमधील अंतर्गत बंडाळी, अनेकांची नाराजी यावर मात करत त्यांनी प्रचार केला.
हे सुद्धा वाचा : Gautam Adani: उद्योगपती गौतम अदानींना नाना पटोलेंचा इशारा; म्हणाले, “हिशोब…”
‘शिट्टी’ काेणाची दांडी उडविणार?
अखेरच्या टप्प्यात मतदार राजा वेगळाच विचार करत असल्याचे ध्यानात येतात लक्ष्मी दर्शन सुरू झाले. मतदानाच्या आदल्या दिवशी अनेक भागात कार्यकर्त्यांनी रात्र जागून काढली. जनमनाचा निश्चित अंदाज बांधता येत नसल्याने ‘कमळ’ पुन्हा खुलणार की तुतारी वाजणार याकडे लक्ष केंद्रीत झाले असताना ‘शिट्टी’ची साथ कोणाला तारक अन् कोणाला मारक ठरणार याचीही उत्सुकता ताणली गेली आहे. परंतु नेमके काय घडणार यासाठी काही तासांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.