मुंबई :गेल्या आठवड्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. फडणवीसांनी त्यांच्या एका माणसाकडे एका एन्व्हलपमध्ये काही मुद्दे पाठवून त्याचे प्रतिज्ञापत्र करून देण्यास सांगितले होते. या मुद्द्यांमध्ये तत्त्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार, अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करायचे होते.पण मी प्रतिज्ञापत्र करून देण्यास नकार दिल्याने मला खोट्या आरोपात तुरुंगात टाकण्यात आले, असाही दावा केला होता.
यानंतर आता अनिल देशमुख यांनी त्यांच्याकडे एन्व्हलप घेऊन आलेल्या व्यक्तीच्या नावाचा खुलासा केला आहे. अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन समित कदम नावाच्या व्यक्तीचे आणि फडणवीसांचे काही फोटो माध्यमांसमोर दाखवत आरोप केले आहेत. तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात समित कदम नावाची व्यक्ती माझ्याकडे आली होती. देवेंद्र फडणवीसांनी कदमकडे एका एन्व्हलपमध्ये तीन-चार मुद्द्यामंध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, पार्थ पवार आणि अनिल परब यांच्यावर आरोप करण्यास सांगितले होते. ही व्यक्ती देवेंद्र फडणवीसांच्या जवळचा माणूस आहे. त्याचे आणि फडणवीसांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्याची पत्नी फडणवीसांना राखी बांधते, असा दावा करत देशमुख यांनी त्यांचे काही फोटोही दाखवले आहेत. इतकेच नव्हे तर, समित कदम साधा कार्यकर्ता आहे. पण तरीही फडणवीसांनी त्याला वाय श्रेणीतील सुरक्षा का दिली आहे. असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला होता. त्यांनंतर अनिल देशमुख यांनीही मानव यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचा दावा करत देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते.
तीन वर्षांपूर्वी माझ्या शासकीय बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या एका खास माणसाने मला ही ऑफर दिली होती महापालिका निवडणुकीसाठी माझ्याकडे उद्धव ठाकरे यांनी पैसे मागितल्याचा आरोप करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला गेला. पण मी तो आरोप केला नाही. आमदार आदित्य ठाकरे यांनी दिशा सालीयनवर बलात्कार करून तिला बाल्कनीतून ढकलून दिल्याचा आरोप करण्यासाठी दबाव टाकला गेला, अनिल परब यांच्या विरोधातही आरोप करण्यास सांगितले गेले. पण मी तेही करण्यास नकार दिला.
इतकेच नव्हे तर, अजित पवारांनी गुटखा व्यावसायिकांकडून कोट्यवधींची कमाई करून देण्यास सांगितले, असा जबाब तपास यंत्रणांसमोर द्या, आणि 100 कोटींच्या वसुली प्रकरणातून सुटका मिळवा, अशीही ऑफर देण्यात आली, पण मी हे सर्व कऱण्यास नकार दिल्यानेच मला 13 महिने तुरुंगात राहावे लागले, असा दावा देशमुख यांनी केला.