
Anjali Damania Press Conference on Parth Pawar Land Scam Pune Koregaon Park
Anjali Damania: मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे जमिनीच्या व्यवहाराच्या घोटाळ्यामध्ये अडकले. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 1400 कोटींची जमीन ही केवळ 300 कोटींना घेतल्यामुळे वाद निर्माण झाला होता. तसेच 21 कोटीचा कर न दिल्यामुळे पार्थ पवारांवर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर हा व्यवहार रद्द झाल्याचे सांगत हे प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागले. अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांनी कोरेगाव पार्कमध्ये केलेल्या व्यवहारावर तीव्र शब्दांत टीका केली. या प्रकरणाच्या तपासासाठी गठित करण्यात समितीवर संशय घेतला आहे. दमानिया म्हणाल्या की, या जमीन व्यवहार प्रकरणात एक समिती स्थापन करण्यात आली. मात्र, सहापैकी पाच सदस्य हे पुण्यातील आहेत. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का? निपक्ष चौकशी ही समिती करू शकेल का? यामुळेच माझी पहिली मागणी आहे की, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदापासून ते पालकमंत्रिपदापर्यंत ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “गायकवाड कुटुंबियांच्या नावाने ही जमीन नाही, मग ते व्यवहार कसा करू शकतात. शीतल तेजवानी नावाच्या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांना या जमिनीबद्दल पत्र दिले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही. यामुळे सर्वात अगोदर या जिल्हाधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन केले पाहिजे. आम्ही तो व्यवहार रद्द करतो, म्हणजे आम्ही चोरीचा माल परत करतो, असे म्हटल्यासारखे आहे,” असा घणाघात अंजली दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांना कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवण्यासाठी पूर्ण तयारी केली असल्याचे दिसून आले.
“खरेदीखत करताना जर खोट्या व्यक्ती उभ्या केल्या तर अशा व्यक्तींना कायद्याने शिक्षा होऊ शकते. सात वर्षे शिक्षा, दंड अथवा दंड आणि शिक्षा अशा दोन्हींची कायद्यात तरतूद आहे. तर जो गुन्हा दाखल झाला आहे. त्यात अमेडिया कंपनीचे नाव नाही. पार्थ पवार यांचे नाव नाही. महसूल मंत्री बावनकुळे म्हणतायेत की, ज्यांनी खरेदीखतावर स्वाक्षरी केली. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. पुन्हा कायदा वेगळंच सांगतो,” हे दमानिया यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“अमेडिया ही लिमिटेड लायबलिटीज पार्टनरशिप फर्म असल्याची माहिती त्यांनी दिली. लिमिटेड लायबलिटीज पार्टनरशिप ॲक्ट 2008 हा त्याचा कायदा आहे. या कायद्यातील तरतूदी त्यांनी विषद केल्या. कलम 38 नुसार, लिमिटेड लायबलिटीज पार्टनरशिपने जर फसवण्याच्या हेतूने असा व्यवहार केला असेल तर मग त्यात कायदेशीर शिक्षेची तरतूद असल्याचे त्यांनी नमूद केले. इतकेच नाही तर पार्थ पवार यांच्यावरील बालंट दूर व्हायचे असेल तर त्यांनी हा व्यवहार झाल्याचं मला माहितीच नव्हतं. असे रजिस्ट्रेशन होत असल्याचे आपल्या गावीच नव्हते असे म्हटले तर मग हे सर्व खापर दिग्विजय पवार यांच्यावर फुटेल असे त्यांनी सांगितले. तर या सर्व प्रकरणात पार्थ पवार याला वाचवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणात अजित पवारांनी राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली. तर लवकरच याविषयी न्यायालयात दाद मागणार असल्याचे दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.