
large number of voters awaited the results of the Kandahar Municipal Council elections Nanded News
नांदेड : डॉ. गंगाधर तोगरे : कंधार येथील नगरपरिषद निवडणुक दिग्गज पुढाऱ्यांनी प्रतिष्ठेची केली होती.दि.२ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. २२ हजार ४४२ पैकी १७ हजार ६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी ७६.०२ इतकी असून नगराध्यक्षासह नगरसेवकांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मतदारांशी संपर्क, गाठीभेटी, कॉर्नर व जाहिर सभा राजकीय पक्षांनी घेऊन वातावरण निर्मिती केली. काँग्रेसने महाविकास आघाडीसह वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष, भाजपा व शिवसेना (शिंदे) पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली.
नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे शहाजी नळगे, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) पक्षाचे हनमंत ऊर्फ स्वप्नील लुंगारे व भाजपाचे गंगाप्रसाद यन्नावार यांच्यात तिरंगी सामना झाला. २० नगरसेवक पदासाठी ६९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.दि.२ डिसेंबर रोजी सकाळी मतदानाला अतिशय संथ गतीने सुरूवात झाली. दुपारनंतर मात्र मतदानाला वेग आला. पुरूष व स्त्री मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रशासनाने मतदान शांततेत व पारदर्शक होण्यासाठीचे नियोजन अतिशय चांगले केले होते.
हे देखील वाचा : सरकारी जमीन खाऊनही FIR मध्ये नाव नाही; पार्थ पवारांवर अंजली दमानियांचा चढला पारा
१७ हजार जणांचे मतदान
कंधार नगरपरिषद निवडणुकीत दि.२ डिसेंबर रोजी मतदान पार पडले. एकूण २६ मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. एकूण मतदार संख्या २२.४४२ होती. त्यात पुरुष मतदार १०,८४९ तर महिला मतदार ११ हजार ५९२ व इतर १ अशी संख्या होती. परंतु पुरुष ८ हजार ५४७ मतदारांनी व महिला ८ हजार ५१२ व इतर १ मतदारांनी असे एकूण १७ हजार ६० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदान ७६.०२ टक्के झाले. कंधार नगरपरिषदेसाठी एकूण ७६.०२ टक्के मतदान झाले.
७६.०२ टक्के मतदान झाले असून तिरंगी लढत झाली आहे. कोण जिंकणार कोण हरणार याची चर्चा आता शहरातील चौका चौकात सुरू झाली आहे. मतदारांनी नेमके कोणाच्या बाजूने कौल दिला, हे स्पष्ट होण्यासाठी आणखी सतरा दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या २१ डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजप व काँग्रेसनेही जोरदार प्रचार केल्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली.
हे देखील वाचा : निष्काळजीपणाचा कळस! कळवा रुग्णालयात ऑक्सिजन वाहिनी बसवण्यास टाळाटाळ
भोकरमध्ये झाला अटीतटीचा सामना; अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला
भोकर नगर परिषदे सार्वत्रिक निवडणुक २०२५ साठी सर्व बुथवर शांततेत मतदान संपन्न झाले. नगरपरिषदेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर होत असल्याने मतदारात एक प्रकारचा उत्साह दिसून आला. मतदानासाठी सकाळ पासुनच सर्वत्र रांगा लागलेल्या दिसल्या. तरुणाईसह ज्येष्ठ नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले. सकाळी १० पासूनच भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण व माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी अनेक वॉर्डा वार्डात फेरफटका मारून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे पुन्हा मतदानाला गती आलेले चित्र दिसले.
भोकर नगरपरिषद साठी शहरातील ३१ बुथवर ११ प्रभागांमधील २१ नगरसेवक व १ नगराध्यक्ष अशा एकूण २२ जागांसाठी नशीब आजमावणाऱ्या १०२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून २१ हजार ६३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. भोकर मधील प्रभाग क्र. १ (ब) मधील निवडणूक न्यायालयाच्या आदेशान लांबली असुन त्या साठी २० डिसेंबर ला मतदान होणार आहे.