पिंपरी : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या प्रत्येक निवडणुकीत सक्रिय सहभाग घेत पडद्यामागून सूत्रे हलवणारे त्यांचे धाकटे बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप (Shankar Jagtap) हे पुन्हा एकदा ‘किंगमेकर’ ठरले आहेत. नेहमी पडद्यामागे राहून भावाला मदत करणारे शंकर जगताप यंदा स्वतःच आमदारकी लढवत असल्यासारखे निवडणूक प्रचारात पायाला भिंगरी लावून पळत होते. संपूर्ण प्रचार यंत्रणा सांभाळण्यापासून ते बेरजेचे राजकारण करण्यापर्यंतचा डावपेच खेळत कसलेल्या राजकारण्याप्रमाणे नियोजन करणाऱ्या शंकर जगताप यांचा मतदारसंघातील करिष्माही या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाला.
भाजप आमदार लक्ष्मण जगताप सलग तीनवेळा चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. २००९ मध्ये अपक्ष, २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपच्या तिकीटावर ते विजयी झाले होते. लोकांमधून निवडून येण्यापूर्वी ते २००४ मध्ये पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर अपक्ष निवडून गेले होते. पण ३ जानेवारी २०२३ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अवघ्या २० दिवसांच्या आतच चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. जगताप कुटुंबावर दुःखातून सावरण्याच्या आतच निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली. कारण भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली.
त्याचप्रमाणे भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे लहान बंधू शंकर जगताप यांच्याकडे संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी सोपवली. दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रत्येक निवडणुकीत पडद्यामागे राहून आपले नेतृत्व सिद्ध करणारे शंकर जगताप यांना पोटनिवडणुकीत सर्वात पुढे राहून विरोधकांना चारीमुंड्या चित करण्याची संधी पक्षाने दिली. या संधीचे सोने करत त्यांनी आपले नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. पक्षात एकी निर्माण करून त्यांनी पोटनिवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा विजय मिळवून दिला. मोठ्या बंधूच्या सर्वच निवडणुकांमध्ये विजयाचा खारीचा वाटा उचलणारे शंकर जगताप पोटनिवडणुकीत वहिनीला यश मिळवून देत विजयाचे शिल्पकार ठरले.
पोटनिवडणुकीला सामोरे जात असताना कुटुंबाला दुःखातून सावरण्याबरोबरच कार्यकर्त्यांना ताकद देणे, दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची कमतरता भासणार नाही याची काळजी घेण्याबरोबरच महायुतीतील सर्व घटक पक्षांना विश्वासात घेऊन त्यांना प्रचारात सक्रिय करण्याचे आव्हानही शंकर जगताप यांच्यासमोर होते. परिपूर्ण नियोजन, पाठपुरावा, कार्यकर्त्यांची जोडणी आणि प्रत्यक्ष मैदानात उतरून केलेल्या राजकीय खेळी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांना विश्वासात घेऊन प्रचार यंत्रणा केलेली सक्रिय यामुळे त्यांनी आपल्या वहिनींना विजयी करून दाखवले. भावाच्या विजयात खारीचा वाटा उचलणारे शंकर जगताप यांनी आता त्यांची वहिनी अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
थेट अजित पवारांनाच क्लिनबोल्ड करून दाखवले
पोटनिवडणूक जाहीर होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चिंचवड मतदारसंघात सहानुभूतीची लाट नसल्याचा दावा केला होता. तसेच ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढून भाजपला हरवणार असल्याचे सांगितले होते. विजय आमचाच होणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. पण भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी पक्ष संघटनेच्या जोरावर सूक्ष्म नियोजन करून दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी चिंचवड मतदारसंघात केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला. त्याच्या जोरावर त्यांनी पोटनिवडणुकीत थेट अजित पवार यांनाच क्लिन बोल्ड करून दाखवले.
जबाबदारी वाढली
पोटनिवडणुकीतील या निकालाने शंकर जगताप यांच्यावरील पक्षाची जबाबदारीही वाढली आहे. आगामी महापालिकेसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढल्यास चिंचवड आणि पिंपरी या दोन विधानसभा मतदारसंघात भाजपच्या जास्त जागा निवडून आणणे शंकर जगताप यांच्यासमोर आव्हान असेल.