
आंदेकर कुटुंबातील सदस्याला निवडणूकीत तिकिट देऊ नका; आयुष कोमकरच्या आईचे भावनिक आवाहन
आंदेकर कुटुंबातील अनेक सदस्य सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंदेकर कुटुंबातील दोन सदस्य निवडणूक लढवण्याची शक्यता चर्चेत आहे. वनराज आंदेकर हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) नगरसेवक होते, त्यामुळे पुन्हा त्याच पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या चर्चांवर प्रतिक्रिया देताना संजीवनी कोमकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
“माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना राजकीय व्यासपीठ देऊ नये. ज्या पक्षाने आंदेकरांना तिकीट दिले, त्या पक्षाच्या कार्यालयासमोर मी आंदोलन करेन,” असे त्यांनी सांगितले. “मला केवळ माझ्या मुलाला न्याय मिळालेला पाहायचा आहे,” अशी भावनिक भूमिका त्यांनी मांडली. आगामी काळात राजकीय पक्ष कोणती भूमिका घेतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
बंडू आंदेकरला दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक
कुख्यात गुंड आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकरच्या आणखी अडचणी वाढल्या आहेत. आयुष कोमकरच्या खुनानंतर आंदेकर टोळीचे अनेक कारनामे समोर येत आहेत. अशातच आता नाना पेठेतील जमिनीचा बळजबरीने ताबा घेऊन त्यावर बेकायदा बांधलेल्या इमारतीत भाडेकरू ठेवून पाच कोटी ४० लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी बंडू आंदेकरला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात न्यायालयाने बंडू आंदेकरला २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी भवानी पेठेतील व्यावसायिकाने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, आरोपी सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ७०, रा. नाना पेठ) आणि मनेष उर्फ मनोज चंद्रकांत वर्देकर (वय ५६, रा. कस्तुरे चौक, गुरुवार पेठ) या दोघांवर खंडणी उकळणे, अतिक्रमण करणे या भारतीय न्याय संहितेच्या कलमांसह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.