विधानसभेला गमावलेली आमदारकी बच्चू कडू पुन्हा मिळवणार? मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले प्रहार संघटनेचे संस्थापक आणि माजी आमदार बच्चू कडू हे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्याला अनेक नेत्यांचा पाठिंबा लाभला. उपोषण मागे घेतल्यानंतरही बच्चू कडू थांबलेले नाहीत. आता ते यवतमाळच्या चिलगव्हाण या पहिल्या शेतकरी आत्महत्या झालेल्या गावापर्यंत पदयात्रा काढणार असल्याची घोषणा करताना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबतही संकेत दिले आहेत.
Manisha Kayande : ‘पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली’; मनिषा कायंदेंचा सभागृहात गंभीर आरोप
या पदयात्रेच्या माध्यमातून बच्चू कडू हे शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक ठळकपणे मांडणार आहेत. मात्र, याच आंदोलनातून भविष्यातील राजकीय फायदा मिळावा, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. “मी राजकारणी आहे, त्यामुळे आंदोलनातून काही राजकीय लाभ झाला तर त्यात वावगं काय?” असा स्पष्ट सवाल करत त्यांनी पुन्हा आमदारकीची इच्छा सूचकपणे व्यक्त केली.
याच मुलाखतीत त्यांनी महायुती सरकारवर टीका करत आपली स्वतंत्र भूमिका अधोरेखित केली. “मला कोणत्याही पक्षाचा गुलाम व्हायचं नाही. मी फक्त जनतेचा गुलाम आहे,” असं म्हणत त्यांनी राजकीय स्वतंत्र भूमिकेवर भर दिला. त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाच्या ऑफरलाही नकार दिल्याचं म्हटलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे, बच्चू कडू यांनी आता शिक्षक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. “सध्या चाचपणी सुरू आहे. २० ते ३० हजार मतदारांशी चर्चा करून निर्णय घेणार,” असं सांगत त्यांनी राजकीय पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.
Narayan Rane : ‘मातोश्री’चा एक भाग राज ठाकरेंना देणार का? नारायण राणे उद्धव ठाकरेंना असं का म्हणाले?
विधानसभेतील पराभवानंतरही बच्चू कडू पुन्हा राजकारणात सक्रीय होत असून, शेतकरी व शिक्षक वर्गाच्या प्रश्नांना घेऊन पुढील निवडणुकांमध्ये स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या राजकीय वाटचालीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
बच्चू कडू यांचे राजकारण नेहमीच वैचारिक स्पष्टतेसाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट भिडण्याच्या शैलीसाठी ओळखले जाते. त्यांनी कायमच कोणत्याही मोठ्या पक्षाची पाठराखण न करता, स्वबळावर निवडणुका लढवल्या आणि जनतेच्या प्रश्नांना अग्रक्रम दिला. यावेळीदेखील ते कोणत्याही पक्षाच्या आधाराशिवाय मैदानात उतरण्याचा विचार करत आहेत, हे त्यांचे राजकीय स्वाभिमान आणि स्वतंत्र भूमिका अधोरेखित करते.
दिव्यांगांच्या प्रश्नांपासून ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंत अनेक सामाजिक मुद्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या प्रहार संघटनेचा प्रभाव ग्रामीण भागात विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आगामी शिक्षक पदवीधर निवडणुकीत त्यांचा प्रवेश हा अन्य राजकीय पक्षांसाठीही मोठं आव्हान ठरू शकतो.