आई कृपा कर, शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची सरकारला सद्बुद्धी दे! बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवीच्या चरणी साकडे
पाथर्डी : अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी बाधित गावांची पाहणी केली. शेतकऱ्यांचे दुःख जवळून अनुभवल्यानंतर माजी कृषिमंत्री काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी पाथर्डी तालुक्यातील श्री मोहटादेवीच्या चरणी प्रार्थना केली. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ताकद दे आणि संकटात शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची केंद्र आणि राज्य सरकारला सद्बुद्धी दे. शेतकऱ्यांच्या ह्या वेदना सरकारच्या काळजापर्यंत पोहोचवण्याची आर्त प्रार्थना आई मोहटादेवीच्या चरणी थोरात यांनी यावेळी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत आमदार हेमंत ओगले, सचिन गुजर, करण ससाने, अभिजीत लुनिया, तालुकाध्यक्ष नासिर शेख यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते
याप्रसंगी माध्यमांशी बोलताना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ते म्हणाले, या पाषाण हृदयी सरकारला काही केल्या पान्हा फुटत नाही. शेतकऱ्यांचे प्रपंच उध्वस्त झाले आहेत, तरीही त्यांची वेदना सरकारपर्यंत पोहोचत नाही. केवळ आकडेवारीचा खेळ करून शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसता येणार नाहीत. महाराष्ट्रात सर्वत्र अतिवृष्टी होत आहे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मी संभाजीनगर जिल्ह्यात पाहणीला सुरुवात केली आणि आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी तालुक्यात शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या.
पुढे बोलताना थोरात म्हणाले, मोहटादेवी हे सर्वांचे आराध्य दैवत आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरू असताना महाराष्ट्रात जवळपास ३० जिल्ह्यांमधील शेतकरी अतिवृष्टीने बाधित झाला आहे. मी छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) आणि अहिल्यानगर येथील अनेक गावांतील शेतकऱ्यांना भेटलो. त्या सर्वांची व्यथा अनुभवल्यानंतर, मी मोहटादेवीला प्रार्थना करतोय की या संकटातून शेतकऱ्यांना वाचव. केंद्र व राज्य सरकारला सुबुद्धी दे. दुर्दैवाने शेतकरी मोठ्या संकटात आहे. खूप नुकसान झाले आहे. जमिनी वाहून गेल्या आहेत. काही शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी ज्यांना लक्ष्मी मानतो त्या गुराढोरांचे मोठे नुकसान झाले आहे, अशा संकटात सरकार कोठे आहे, असा प्रश्न पडतो आहे.
मंत्री येतात आणि जातात, काही बोलत नाहीत, उत्तरे देत नाहीत. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास नाही म्हणून देवीचरणी प्रार्थना आहे की, अशा नैसर्गिक संकटामध्ये शेतकरी बांधवांना ताकद दे आणि या राज्य व केंद्र सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्याची सुबुद्धी दे अशी प्रार्थना बाळासाहेब थोरात यांनी केली.
हे सुद्धा वाचा : बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाची हत्या, पोटात चाकू खुपसून संपवलं; कारणही आलं समोर