बारामती : लावणी नर्तिका गौतमी पाटीलच्या संपूर्ण कार्यक्रमात महाराष्ट्रभर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी यशवंत ब्रिगेड संघटनेने केली आहे. यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष बापूराव सोलनकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
गौतमी पाटीलच्या अश्लील नृत्यामुळे तरुणाईमध्ये चुकीचा संदेश जात असून, गौतम पाटील हिने पब्लिसिटीसाठी राज्यातील युवा वर्गाला भुरळ घातली आहे. महाराष्ट्राला एक सांस्कृतिक परंपरा आहे. गौतमी पाटीलचे नृत्य कमी पण अश्लीलता जास्त असल्याने महाराष्ट्रभर तिच्या कार्यक्रमावर कायमची बंदी घालण्यात यावी.
महाराष्ट्रातील लावणी परंपरेला व संस्कृतीला छेद देत सार्वजनिक ठिकाणी अश्लील नृत्य सादर करीत असते, तिच्या हावभावाचे व्हिडिओ मोबाईल मुळे घराघरात पोहोचतात. घरामध्ये माता भगिनी मुल मुली असतात, त्यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. गौतमी पाटील सार्वजनिक ठिकाणी नृत्यांचा नावाखाली अश्लील वर्तन करत करतात, त्यामुळे कार्यक्रमात गोंधळ निर्माण होतो.
तसेच महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे तिच्या कार्यक्रमावर कायमची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी यशवंत ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून या निवेदनावर देवेंद्र बनकर, पुरुषोत्तम ढोणे, धनंजय पडळकर, प्रा कैलास महानोर, ऋषिकेश नारुटे इत्यादींच्या सह्या आहेत.