
भोसे येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य आरोग्य, योग व जीवनशैली शिबिर संपन्न; १०० हून अधिक ज्येष्ठांची आरोग्य तपासणी!
वाई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, सातारा आणि महात्मा बसवेश्वर बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक धोरण योजनेअंतर्गत, भोसे (ता. महाबळेश्वर) येथील ‘एकोपा ज्येष्ठ नागरिक संघाच्या’ वतीने जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य, योग, जीवनशैली आणि आहार मार्गदर्शन शिबिराचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
वाढत्या वयात आरोग्याची काळजी घेणे आणि निरोगी जीवनशैली अंगीकारणे किती गरजेचे आहे, हाच संदेश या शिबिराच्या माध्यमातून देण्यात आला. शिबिरामध्ये परिसरातील जवळपास १०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर), ईसीजी (ECG) तसेच डोळे, नाक, कान आणि घसा यांची सखोल तपासणी करून आवश्यक ते वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराच्या पूर्वार्धात प्रसिद्ध योगगुरू डॉ. सुनील शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनातील योगाचे आणि प्राणायामाचे महत्त्व प्रात्यक्षिकांसह पटवून दिले. त्यांनी ज्येष्ठांकडून वयाला सुयोग्य अशी विविध प्रकारची योगासने आणि हलके व्यायाम करून घेतले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता.
तर उत्तरार्धात, सेवानिवृत्त प्राचार्य रवींद्र येवले सर यांनी ‘वृद्धापकाळातील आव्हाने आणि जीवनशैली’ या विषयावर अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. वाढत्या वयात येणाऱ्या शारीरिक व मानसिक अडचणींना धैर्याने कसे सामोरे जावे, सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा आणि उतारवयातही स्वतःला आनंदी व व्यस्त कसे ठेवावे, याबाबत त्यांनी मोलाचे सुतोवाच केले. तसेच, बदलत्या ऋतूनुसार ज्येष्ठांचा आहार कसा असावा, याबाबतही शिबिरात विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाला अनेक प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून ज्येष्ठांचा उत्साह वाढवला. यामध्ये विशेष अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी श्रुती रटके, सहाय्यक अधिकारी सुनील जाधव, समाजकल्याण निरीक्षक श्री. म्हस्के यांनी उपस्थित राहून शासनाच्या ज्येष्ठ नागरिक धोरणांविषयी आणि विविध कल्याणकारी योजनांविषयी माहिती दिली.
तसेच, भोसे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गणेश गोळे, उपाध्यक्ष विजयकुमार भिलारे, सचिव नारायण भोज, ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष संपतराव भोसले, अखिल भारतीय ग्राहक पंचायत सातारा जिल्हाध्यक्ष प्रल्हाद कदम, जिल्हा सचिव किशोर फुले, प्रांत सदस्य सतीश जेबले, जगन्नाथ भिलारे यांच्यासह महात्मा बसवेश्वर संस्थेचे प्रतिनिधी जितेंद्र सोनवणे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व कार्यकारी मंडळ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा बसवेश्वर बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव श्री. योगेश पाटील यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत, या शिबिरामागची भूमिका आणि त्याचे महत्त्व विशद केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. समीर बेलोशे, डॉ. जावेद खान, आरोग्य निरीक्षक श्री. चव्हाण, आरोग्य सहाय्यक गोंजारी, तसेच सलोनी कदम व श्रुती काकडे या परिचारिकांच्या वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले. आरोग्याची उत्तम तपासणी आणि मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याने उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आयोजकांचे विशेष आभार मानले.