पुणे : पुणे पोलिसांकडून थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांच्या तस्करांवर जोरदार कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. कोंढवा तसेच येरवडा भागात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना दुहेरी कारवाईत पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून पावणे चार लाखांचा ऐवज देखील जप्त केला आहे.
कोंढवा भागातील पहिल्या कारवाईत पोलिसांनी अब्बास युसुफ शेख (वय ४०, रा. कोंढवा) याला अटक केली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत एक इलेक्ट्रीक वजनकाटा, मोबाईल तसेच एमडी असा १ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दुसऱ्या कारवाईत येरवड्यात छापेमारी करून एमडी अमली पदार्थ पकडला आहे. या प्रकरणी बिलाल मस्तान शेख (वय २१) या तरुणाला अटक केली आहे. येरवडा पोलीस ठाण्यात त्याच्यावर एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पाहिला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. नुकतीच पुणे पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत तब्बल दोन कोटींचे मेफेड्रोन पकडले होते. तर, गांजा तस्कर व इतर अमली पदार्थांची तस्करी करणारे देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसत आहे. पोलिसांकडून अशा तस्करांवर लक्ष ठेवले जात आहे.
थर्टीफस्ट जवळ आल्याने आता पार्ट्यांचे नियोजन केले जात आहे. थर्टीफस्टला अमली पदार्थांची मोठी मागणी असते. आडोश्याला तसेच छुप्या पद्धतीने या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून पार्ट्या व तस्करांवर कारवाई करण्याची सूचना दिली आहे. त्यानूसार, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्याकडून पथकांना आवश्यक त्या सूचना दिल्या गेल्या आहेत. अमली पदार्थ विरोधी पथक या तस्करांवर लक्ष ठेवून कारवाई करत आहे.