
तासगावात भाजप स्वबळावर मैदानात उतरण्यासाठी सज्ज; संजय पाटील गटाला आव्हान
तासगाव : तासगाव नगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच भाजपने आपल्या रणनितीची ‘अॅक्शन प्लॅन’ पातळीवर अंमलबजावणी सुरू केली आहे. पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून, नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी तब्बल ६० जणांनी अर्ज सादर केले. मुलाखतींच्या प्रक्रियेला आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस संदीप गिड्डे-पाटील यांची उपस्थिती लाभली.
भाजपकडून यावेळी ‘स्वबळावर’ लढण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पक्षाचे स्थानिक नेतृत्व या मोहिमेत आघाडीवर आहे. शहरात भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती सूर्यवंशी आणि तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभागनिहाय संपर्क मोहिमा सुरू आहेत. प्रत्येक विभागात ‘कमळ’ फुलवण्याचा निर्धार व्यक्त होत आहे. गेल्या निवडणुकीत त्यावेळी भाजपामध्ये असलेले माजी खासदार संजय पाटील गटाने सत्ता मिळवली होती. मात्र, यावेळी भाजपसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचेही वेगळे समीकरण दिसत असून, या निवडणुकीत तासगावमधील सत्तेचे गणित कसे सोडवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सत्यजित देशमुख यांनी मुलाखतीनंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाचा नवा अध्याय सुरू आहे. तासगावचाही चेहरा बदलायचा असेल, तर पालिकेवर ‘कमळ’ फुललेच पाहिजे. भाजपच्या या हालचालींमुळे तासगावच्या राजकारणात नवे वातावरण तयार झाले आहे.
भाजपाचा ‘डबल गेम’ ; संजय पाटलांना घेराव?
गेल्या निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील गटाने नगरपालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. भाजपकडून संजय पाटील गटाला ‘राजकीय आयसोलेशन’ देण्यासाठी आखलेला प्लॅन आता स्पष्ट दिसू लागला आहे. राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्यातील शीतयुद्ध गेल्या काही महिन्यांपासून गडद झाले आहे. तासगाव पालिका हीच त्या संघर्षाची पहिली चाचणी ठरणार आहे. पक्षाने यावेळी शहरात स्वतःच्या नेतृत्वाखाली उमेदवार निवड प्रक्रिया हाती घेतल्याने, संजय पाटील गटाच्या प्रभावाला मर्यादा आणण्याचा भाजपचा स्पष्ट प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
निवडणूक तिरंगी की चौरंगी हाेणार?
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि आमदार रोहित पाटील गट जोरदार तयारीत आहेत. भाजपकडून नियोजनबद्ध हालचाली सुरू असताना आमदार व माजी खासदारांचा गट मात्र अजून ठोसपणे मैदानात उतरलेला दिसत नाही. दरम्यान, अजित पवार गटाने ‘स्वतःच्या ताकदीवर’ निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केल्याने तासगावची निवडणूक तिरंगी राहणार की चौरंगी रंग घेणार, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.