
अभिजीत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद, भविष्यातही त्यांना...; प्रवीण दरेकरांनी केले कौतुक
पंढरपूर : आमदार अभिजीत पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशीर्वाद दिला आहे. ते कुठल्या पक्षाचे आहेत त्यापेक्षा शेतकऱ्याला ताकद देत असून, असा होतकरू तरुण ताकदीने मैदानात उभा आहे तर त्याला ताकद दिली पाहिजे, या भावनेतून आम्ही सर्वजण विठ्ठल कारखान्याच्या सभासद आणि संचालक मंडळासोबत आहोत, असे भाजपाचे नेते आमदार प्रविण दरेकर यांनी सांगितले.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ सुरू असलेल्या गळीत हंगामातील पहिल्या ५ साखर पोत्यांचे पूजन आमदार प्रविण दरेकर, त्यांच्या पत्नी सायली दरेकर, डॉ. यश प्रविण दरेकर व कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, कारखान्याचे संचालक संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, महेश खटके, विठ्ठल रणदिवे, दशरथ जाधव, अशोक तोंडले, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, तानाजी बागल, समाधान गाजरे, धनाजी खरात, उमेश मोरे, गणेश ननवरे, संचालक, सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
कारखानदारी ही ग्रामीण भागातील आर्थिक उलाढाल करणारी मुख्य संस्था आहे. आज सहकारी साखर कारखाने खासगी झाले व सहकारी कारखाने अडचणीत यायला लागले. सहकारी तत्वावर लोकांचा कारखाना असतो. तो लोकांसाठी असतो. म्हणून अभिजित पाटील यांनी सहकारी साखर कारखान्यावर प्रेम केले व लोकांसाठी काम करत राहिले, असे दरेकर म्हणाले.
विठ्ठल साखर कारखानदारीचे वैभव
आमदार दरेकर म्हणाले, विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील साखर कारखानदारीचे वैभव आहे. मध्यंतरीच्या काळी कारखान्याला घरघर लागली होती. आमदार अभिजित पाटील यांनी कारखान्याच्या व सभासदांच्या रक्षणासाठी उडी घेतली. त्यांच्या नेतृत्वावर तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला व कारखान्याचे नेतृत्व त्यांच्याकडे दिले. कारखानदारीशी संबंध नसतानाही केवळ तुमच्याविषयी प्रामाणिक संवेदना होती म्हणून हा कारखाना आज प्रगतीकडे जाताना दिसत असल्याचे दरेकर म्हणाले.
कारखाना अडचणीतून बाहेर काढला
दरेकर म्हणाले, मुंबई जिल्हा बँकेचे मुंबई हे कार्यक्षेत्र आहे. परंतु ग्रामीण भागातील कारखाने अडचणीत आले तर त्या कारखान्यांना ताकद देण्याचे, उर्जितावस्थेत आणण्यासाठी मदत आम्ही करतो. आमदार अभिजित पाटील यांनी धाडसाने कारखाना अडचणीतून बाहेर काढण्याचे काम केले. म्हणून मुंबई बँक त्यांच्या मागे ताकदीने उभी आहे. अभिजित पाटील यांना विठ्ठल एवढा पावला कि विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष होत असताना विधिमंडळाच्या सभागृहात येण्याची संधी तुम्ही दिली.
पाठिशी उभे राहणे आमचे कर्तव्य
जो लोकांच्या भल्याची चिंता करतो, जो आपल्या राज्याच्या विकासासाठी हातभार लावणारा प्रकल्प हिमतीने यशस्वी करत असेल तर त्याला ताकद देणे, त्याच्या पाठिशी उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. भविष्यातही पाटील शेतकऱ्यांसाठी जे प्रकल्प हाती घेतील त्यासाठी मी आणि मुख्यमंत्री त्यांच्या मागे असेच उभे राहू, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.