फोटो सौजन्य - सोशल मीडिया
चंद्रपूर : लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये भाजपला राज्यासह केंद्रामध्ये मोठा धक्का बसला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने ‘अब की बार 400 पार’ असा नारा दिला होता. मात्र भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा गाठता आला नाही. तसेच ‘नरेंद्र मोदी यांची गॅरंटी’ असा देखील प्रचार भाजपकडून लोकसभा निवडणुकीमध्ये करण्यात आला. मात्र यावरुन आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. आजकाल राजकारणाची गॅरंटी २४ तासांची आहे असे वक्तव्य भाजप नेत्यांनी केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
हे वाक्य शिंदेंनी आजपर्यंत कधीही वापरलं नाही
सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ते म्हणाले,“ महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे काही मोठे नेते उपस्थित नव्हते. त्यांना ज्यावेळी विचारणा केली तेव्हा त्यांना निमंत्रणच दिलं नव्हतं. आता महाविकास आघाडीची येथून सुरुवात आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक होईपर्यंत अजून काय काय पुढे येईल हे पाहावं लागेल”, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. तसेच महायुतीमध्ये शिंदे गट मोठा भाऊ असल्याच्य वक्तव्यावर देखील सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “याबाबत मला माहिती नाही. पण हे वाक्य एकनाथ शिंदे यांनी आजपर्यंत कधीही वापरलं नाही. एखादा व्यक्ती उत्साहात येऊन हे म्हणत असेल तर ती शिवसेना शिंदे गटाची भूमिका असू शकत नाही” असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी मांडले.
आजकाल राजकारणाची गॅरंटी 24 तासांची
‘जे पक्ष सोडून गेले, त्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही’, अशी भूमिका उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी स्पष्ट केली. यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, “त्यांना माहिती आहे की ते आता येणार नाही आणि हेही घेणार नाही. त्यामुळे हा प्रश्नच उपस्थित होत नाही. आजकाल आपल्या म्हणण्याचं किंवा आपण जे वाक्य बोलतो त्याची एक्स्पायरी डेट राजकारणात २४ तासांची राहिली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या भाष्यांची एक्स्पायरी डेट हे २४ तासांची आहे”, असं सूचक विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.