पंकजा मुंडे धनंजय मुंडेंच्या अचानक भेटीला, काय आहे नेमकं कारण?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे. या क्रूर हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर हे राक्षसी कृत्य करणाऱ्या आरोपींबाबत संतापाची लाट उसळली आहे. याचमुळे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच मंत्री पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या भेटीसाठी सातपुडा बंगल्यावर दाखल झाल्या आहेत.यामुळे आत्ताच्या घडीची राज्याच्या राजकारणातील ही सर्वात मोठी घडामोड मानली जात आहे.
मुंबईत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची मुंबईतील सातपुडा बंगल्यावर गुरुवारी (ता.6) भेट घेतली. या भेटीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र,पंकजा मुंडे या अचानक धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर दाखल झाल्यानं या भेटीमागं मोठं कारण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचे संतोष देशमुख हत्ये प्रकरणात आरोपी म्हणून नाव आल्यानंतर विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर मुंडे यांनी आपला राजीनामा देत मंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले होते.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या भगिनी आणि भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे. मी त्याचे स्वागत करते. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. या राजीनाम्यापेक्षा शपथच व्हायला नको होती, असं उद्गार काढल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करून दिली होती.यावेळी त्यांनी आपल्या पोस्टमध्ये बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे.काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे असं म्हटलं होतं.
तसेच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे.माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.त्यामुळे वैद्यकीय कारणास्तवसुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे सोपवला असल्याची माहिती दिली होती.