आगामी निवडणुकीत आघाडीसोबत राहणार का? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, 'आघाडीचा निर्णय...'
पुणे : पुण्यातील प्रश्न सोडविण्यासाठी विकासाचा दृष्टीकाेण असलेले नगरसेवक आपल्याला निवडून आणावे लागतील, त्यादृष्टीने महापािलका निवडणुकीच्या तयारीला लागा, असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. त्याचवेळी महाविकास आघाडीत एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय हा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षाच्या पुणे शहर कार्यकारिणीची विक्रमी ५० वी बैठक व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. वानवडी येथील महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवनात पार पडलेला हा मेळावा आगामी निवडणुकीची नांदी ठरला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार यांनी पुण्याच्या प्रश्नांचा मागाेवा घेत, विकासाचा दृष्टीकाेण असलेले नगरसेवक निवडून आणून देण्याची गरज व्यक्त केली.
हेदेखील वाचा : स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वीच संतोष बांगरांचा ‘मास्टरस्ट्रोक’; ‘या’ निवडणुकीत विरोधकांना चेकमेट
मेळाव्याच्या उपस्थितीचा उल्लेख करत पवार यांनी पुण्यातील वातावरण राष्ट्रवादीमय होतंय हा विश्वास व्यक्त केला. ‘‘सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. आपला पक्ष गांधी, नेहरू, आझाद यांचा विचार मानणारा पक्ष आहे, हाच विचार घेऊन आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. निवडणुकीतील इतर पक्षांसोबत संभाव्य आघाडीचा निर्णय प्रदेश पातळीवर घेतला जाईल व निर्णय घेताना शहरातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाईल.’’
यावेळी माजी आमदार कुमारभाऊ गोसावी, माजी आमदार कमलनानी ढोले पाटील, माजी शहराध्यक्ष रवींद्र माळवदकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी आलेल्या सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रास्ताविक सादर करत शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार असल्याची ग्वाही दिली.
शहरातील प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी
पुणे शहर सध्या असंख्य अडचणींचा सामना करत असल्याचे नमूद करत पवार यांनी वाहतूक काेंडी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्य सुविधांचा प्रश्न असे असंख्य प्रश्न पुणेकर नागरिकांना भेडसावत असल्याचे स्पष्ट केले. नागरी प्रश्न साेडविण्यासाठी महापालिकेत सत्ता आली पाहिजे.
अनुभव असलेले सहकारी आपल्यासोबत
महापालिकेत काम करण्याचा अनुभव असलेले अनेक सहकारी आपल्यासाेबत आहेत. त्यांना पुन्हा महापालिकेत पाठवावे लागणार आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सगळ्या जागा आपल्याला मिळतील असे नाही. काही जागा मित्रपक्षांना द्याव्या लागतील. नव्या उमेदीच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, त्यांना तुम्ही सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले.