BJP-Shinde Shivsena:पुण्यापाठोपाठ नवी मुंबई आणि संभाजीनगरमध्ये भाजप-शिंदेसेनेची युती तुटली
BJP-Shinde Shivsena Alliance: महापालिका निवडणुकांच्या धामधुमीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील मतभेद शिगेला पोहचले आहेत. पुण्यापाठोपाठ आता नवी मुंबई आणि संभाजीनगरमध्येही शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती तुटली आहे. पुणे, नवी मुंबई आणि संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा नारा दिला आहे. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उमेदवार उभे करणार असल्यामुळे या ठिकाणी राजकीय समीकरणेही बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे, नवी मुंबई आणि संभाजीनगर याठिकाणी भाजप आणि शिंदे शिवसेना स्वबळावर लढणार आहेत. दोन्ही पत्र स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. भाजप आणि शिंदेसेनेत जागावाटपावरून मतभेद झाल्यामुळे युती तुटल्याची चर्चा आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. त्यामुळे आगामी काळात नवी मुंबईत भाजपचे गणेश नाईक विरूद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना चुरशीचा होणार असल्याचे दिसत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अखेर भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याचे स्पष्ट झाले असून, दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे महापालिका निवडणूक लढवणार आहेत. याबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा केली. पत्रकारांशी बोलताना संजय शिरसाट यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये युती व्हावी, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले. स्थानिक पातळीवरही बैठका घेण्यात आल्या. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका वेगळी असल्याचे दिसून आले. युतीबाबत शंका आधीपासूनच होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“मी वेळोवेळी स्थानिक नेत्यांशी संपर्क साधून बैठका घेतल्या. भाजप नेते बावनकुळे यांच्यासोबतही चर्चा झाली. शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा होऊन जागावाटप ठरले होते. त्या वेळी युती झाली, अशा संभ्रमात आम्ही होतो. मात्र अखेर युती होऊ शकली नाही.” असही शिरसाटांनी स्पष्ट केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये युती तुटल्याने आगामी महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार असून, निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Pune Election : भाजपकडून बहुतेक विद्यमानांना घरचा रस्ता; नवाेदित चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयाेग
भाजपच्या हट्टी आणि आग्रही भूमिकेमुळेच भाजप–शिवसेना युती तुटल्याचा आरोप शिरसाट यांनी केला. युती तुटल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर थेट शब्दांत नाराजी व्यक्त केली. संजय शिरसाट म्हणाले की, जागावाटपाच्या वेळी शिवसेनेच्या जागा सोडल्या जातील, असा प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज होतील, अशी भूमिका भाजपने घेतली होती. एकीकडे युतीबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात होते, मात्र प्रत्यक्षात कोणताही सन्मानपूर्वक किंवा नवा प्रस्ताव देण्यात आला नाही, असा आरोप त्यांनी केला.
शिरसाट म्हणाले, “भाजपने आपल्या आग्रही भूमिकेला तडा दिला नाही. आमची ताकद वाढली असून आम्ही काहीही करू शकतो, असा अहंकार त्यांच्यात होता. त्याच अहंकाराचा आज शेवट झाला असून भाजप–शिवसेना युती तुटली आहे. भाजपच्या हट्टापायीच ही युती तुटली.”
दीप्ती शर्मा इतिहास रचण्याच्या मार्गावर, हा पराक्रम आजपर्यंत कोणत्याही महिला क्रिकेटपटूने केला नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतरही स्थानिक भाजप नेत्यांनी वेगळाच खेळ खेळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही शिरसाट यांनी केला. तसेच, आम्हाला अंधारात ठेवून मुलाखती घेतल्या गेल्या. शिवसेनेची धावपळ होईल, असा भाजपच्या नेत्यांचा समज होता. मात्र त्यांनी आमच्याशी विश्वासघात केला आणि अखेर युती तोडली,” असा आरोप संजय शिरसाट यांनी केला. या आरोपांमुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण अधिक तापले असून, आगामी महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.






