कुडाळ : बंजारा समाजासाठी प्रगतीचा रस्ता भाजप दाखवेल, असे प्रतिपादन रविवारी कुडाळ येथे पार पडलेल्या गोर बंजारा समाजातील नागरिकांच्या भाजप पक्षप्रवेशावेळी केले. कुडाळ येथे रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो गोर बंजारा समाजातील नागरिकांचा भाजप प्रवेश आयोजित केला होता. त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप नेते निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, रणजीत देसाई, आनंद शिरवलकर, संध्या तेरसे, दीपलक्ष्मी पडते, रुपेश कानडे, श्रीपाद तवटे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजप नेते निलेश राणे म्हणाले की, गोर बंजारा समाजाचा प्रतिसाद मी पाहतोय. त्यामुळे तुम्ही सर्व आमच्यासोबत आहात हे दिसून येते. मी आपल्याला शब्द देतो की, तुमच्या बंजारा समाजाचे जे प्रश्न असतील ते आमचा पक्ष सोडवेल.
या कार्यक्रमाला विरोध झाला आहे. ८० वर्षाच्या एका माणसाने आपल्या गोर बंजारा समाजातील लोकांना धमकी दिली. त्याने खरा आशीर्वाद देणे आवश्यक होते. तुम्हाला दिलेली धमकी म्हणजे आम्हाला दिली होय. आमचा पुनर्जन्मावर विश्वास नाही. आम्ही हिशेब याच जन्मात चुकता करतो, असा टोलाही विरोधकांना लगावला. तर स्थानिक आमदारांना टोला लगावताना म्हटले की, आमदारसाहेब आम्ही दुसऱ्यांच्या तुकड्यांवर जगत नाही. यावेळी निलेश राणे यांनी गोर बंजारा समाजाला उद्देशून म्हटले की, जरा तुम्हाला पुन्हा अशा धमक्या आल्या तर तुम्ही फक्त मला कॉल करा, मी पुढचे काय ते बघतो. तुमच्याबरोबर राणे कुटुंबीय आहे. आता मुख्य प्रवाहात बंजारा समाजाला घेण्यात येईल. शेवटच्या श्वसापर्यंत हा निलेश राणे तुमच्या सोबत आहे, असे आश्वासनही त्यांनी गोर बंजारा समाजाला दिले.
ऐतिहासिक मेळावा यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे आपल्या भाषणात म्हणाले की, हा ऐतिहासिक मेळावा असून तुमची उपस्थिती महत्वाची आहे. तुमच्या समाजात बदल होण्यासाठीच हा मेळावा महत्वाचा ठरेल. आज तुमच्या समाजाने भाजप पक्षावर विश्वास दाखविला हे महत्वाचे आहे. तुमचे समाज वंशज १८ व्या शतकात या भागात आले. येथे आले आणि कॉन्ट्रॅक्टर झाले. पण तुमच्यातील बाकी बांधव मागे राहिला. तुमचा समाज काम, शिक्षणामध्ये मागे राहिला. तुम्ही का पुढे जात नाही याची कारणे शोधणे आवश्यक आहे. तुमच्यातील कोणीतरी ज्यावेळी मोठा व्यावसायिक बनेल त्यावेळी खरे सार्थक होईल. मी सुद्धा गरिबी पाहिली आहे. मुंबईत जाऊन मी कष्ट केलेत. त्यामुळे तुमच्यात बदल होणे आवश्यक आहे.
आता विकसित भारत संकल्प यात्रा तुमच्या गावापासून सुरू करूया. तुम्ही हक्काने हाक मारा, सदैव तुम्हाला मदत करण्यास भाजप पक्ष तयार आहे. समाजाच्या विकासासाठी सरकारच्या योजना तुम्ही जाणून घ्या. केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेमुळे तुम्हाला स्थैर्य येईल.
काही लोक तुम्हाला भाजपमध्ये जाऊ नका म्हणून सांगत होते. हे मला आता समजले. बंजारा समाजाला त्रास झाला तर फक्त कॉल करा, असे वक्तव्य नारायण राणे यांनी करताना राज्यात आजवर नाईक झालेत, जे मुख्यमंत्री होते, हे तुमच्या समाजातील होते. पण तो, नाईक तुमच्यापैकी नाही. याने सिंधुदुर्गात काय आणले? हा नाईक मातोश्रीवरील गडी आहे. मी या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज, इंजिनियर कॉलेज आणले. पण मागील ९ वर्षात कुडाळ – मालवणमध्ये विकास खुंटला. आज मोदीसाहेब सत्तेत आल्याने भारत आत्मनिर्भर बनेल. आज अमेरिका, चीन मोदींचे कौतुक करते. तुमच्या समाजाच्या अडचणी दूर करण्यात मोदी सरकार आहे.
उद्धव ठाकरे यांनी मागच्या अडीच वर्षात काय केले? यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या अडीच वर्षात काय केले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोकणात यायचे आणि मासे खायचे हेच काम उद्धव आणि आदित्य यांनी केले. या कोकणात किती उद्योग आजवर आणले, अशी टीका राणे यांनी केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गेले आणि शिवसेना गेली, असा टोलाही त्यांनी लगावला.
तुमचा समाज मागे पडला असला तरी आता संत सेवालाल आणि छत्रपती शिवरायांचे विचार अंगिकारा, असा उपदेश केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी गोर बंजारा समाजाला केला. तर लवकरच तुमच्या गावात येईन, घरात येईन. तुम्ही कसे राहता हे पाहिन. मी मुंबईतील बंजारा समाज जवळून पहिला आहे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंजारा समाज जवळून अनुभवायचा आहे, असेही ते म्हणाले.