'दादा', 'साहेब' दोन दिशेला; ‘राष्ट्रवादी’च्या शक्तिप्रदर्शनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
पुणे/महेंद्र बडदे : दोन्ही राष्ट्रवादी कॉंंग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा रंगली असतानाच, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाच्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम पुण्यातच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानिमित्ताने ‘साहेब’ आणि ‘दादा’ यांचे शक्तिप्रदर्शन पाहण्यास मिळेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर दोन्ही नेते काय भूमिका मांडणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला समजला जात होता. काँग्रेस फुटीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व गाजविले. पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महापालिका आणि जिल्हा परीषद या तीनही स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांचे वर्चस्व होते. बदलत्या राजकीय गणितामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फुट पडली आहे. पक्षात फुट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मूळ पक्षाचे संस्थापक शरद पवार असे दोन पक्ष निर्माण झाले. पुणे जिल्ह्यात या फुटीचा परीणाम दिसून येण्याची शक्यता आहे. भाजपाने पुणे जिल्हा परीषदेत संख्याबळ वाढविले. पण त्याचवेळी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतही भाजपने सत्ता काबीज केली. भाजपासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्यात सर्वांत मोठे आव्हान होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच फुट पडल्याने भाजपला फायदा होणार का? या प्रश्नाचे उत्तर पुढील काळात बदलत्या राजकीय गणितावर अवलंबून असेल. तुर्तास ‘दादा’ आणि ‘साहेब’ यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपापले शक्तिप्रदर्शन दाखविण्यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत.
‘दादा’ गटाचा वर्धापनदिन बालेवाडीत
पुणे जिल्ह्याच्या राजकारणात शरद पवार यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वरचष्मा राहीला आहे. प्रशासनावर पकड आणि कामे मार्गी लावण्याची गती, यामुळे ‘दादा’ लोकप्रिय ठरले. पुणे जिल्हा परीषद, पिंपरी चिंचवड महापालिकेत दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक हाती यश मिळाले होते, तर पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस हा संख्या बळाच्या तुलनेत मोठा पक्षही ठरला होता. कॉंग्रेसला सोबत घेऊन त्यांनी महापालिकेत सत्ता मिळविली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पुण्यातील ४२ पैकी पन्नास टक्क्याहून अधिक नगरसेवक हे दादांच्या सोबत गेले आहेत. जिल्हा परीषदेतही तीच परीस्थिती आहे. सात महीन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘दादा’चे समर्थक चेतन तुपे हे निवडुन आले. पुणे महापालिकेत पुन्हा एकदा पक्षाची ताकद वाढविण्यासाठी त्यांच्या पक्षाकडून जोरदार प्रयत्न केले जातील. महायुतीसोबत लढताना त्यांच्या वाट्याला किती जागा मिळतील यावरच बरेच चित्र अवलंबून असेल. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात बालेवाडी येथे होणाऱ्या पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘साहेबांचा’ कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदीरात
लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात चांगले यश मिळविले होते. विधानसभा निवडणुकीतही पक्ष चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. अनपेक्षितपणे महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत पिछाडी पहावी लागली. संघटनात्मक पातळीवर पक्षात पडलेल्या फुटीचा परीणाम साहेबांच्या पक्षाला बसला असला तरी, विधानसभा निवडणुकीत पुणे शहरात त्यांच्या पक्षाचा एक आमदार बापू पठारे यांच्या रुपाने निवडुन आला. महापालिकेतील ४२ पैकी वीस पेक्षा कमी नगरसेवक हे सध्या साहेबांबरोबर आहेत. पुणे शहरात साहेबांना मानणारा एक वर्ग, मतदार आहे, त्याचा उपयोग स्थानिक पदाधिकारी कशा पद्धतीने करून घेणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. साहेबांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या तुलनेत कमी आहे. विविध आंदोलनांच्या माध्यमातून पक्षाची ताकद दाखविण्याचा प्रयत्न स्थानिक पदाधिकारी करीत असतात. त्यांचा खरा कस हा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानंतरच लागणार हे मात्र निश्चित आहे.