
फोटो सौजन्य - Social Media
पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पोलिस प्रशिक्षक फायरिंग प्रशिक्षणात बुलढाणा जिल्हा पोलिस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. या खडतर प्रशिक्षणात बुलढाणा जिल्ह्याचे राखीव पोलिस निरीक्षक विकास तिडके यांनी उत्कृष्ट नेमबाजीचे प्रदर्शन करत १ रौप्य आणि २ कांस्यपदके पटकावली. त्यांच्या या यशामुळे बुलढाणा पोलिस दलाचे राज्यभरातून कौतुक होत असून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
११ मे ते १६ मे दरम्यान एसआरपीएफ गट क्र. ०१, पुणे येथे या राज्यस्तरीय प्रशिक्षक फायरिंग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि आयुक्तालयांमधील राखीव पोलिस निरीक्षक, राखीव पोलिस उपनिरीक्षक तसेच कवायत निदेशक या निवडक अधिकारी व अंमलदारांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला होता. अत्यंत कठीण आणि शिस्तबद्ध अशा या प्रशिक्षणामध्ये बुलढाणा जिल्हा पोलिस दलाने प्रभावी कामगिरी नोंदवली.
बुलढाणा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राखीव पोलिस निरीक्षक विकास तिडके यांच्यासह मुख्यालयातील एकूण सात अंमलदारांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान अचूक नेमबाजी, शारीरिक क्षमता, तांत्रिक कौशल्य आणि शिस्त या सर्व बाबींमध्ये बुलढाणा पोलिस दलाने उत्कृष्ट कामगिरी केली.
या प्रशिक्षणात यशस्वी कामगिरी करणाऱ्या विकास तिडके यांच्यासह ग्रेड पोलिस उपनिरीक्षक मुतलीब शेख, महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल अर्चना ठाकरे, पोलिस हेडकॉन्स्टेबल शिवाजी साबळे, रामेश्वर जवंजाळ, नरेंद्र चव्हाण तसेच कवायत निदेशक सरदार अजीज खान या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना एसआरपीएफ गट क्र. ०१, पुणे येथील कमांडंट सपना गौरे यांच्या हस्ते प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्यस्तरावर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करून परतलेल्या या अधिकारी व जवानांचा बुलढाणा पोलिस अधीक्षक कार्यालयात विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या हस्ते तसेच अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पदक विजेते विकास तिडके आणि प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
या यशामुळे बुलढाणा पोलिस दलाच्या कार्यक्षमतेला आणि प्रशिक्षण क्षमतेला राज्यपातळीवर नवी ओळख मिळाली आहे. कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर बुलढाणा पोलिस दलाने ही कामगिरी साध्य केली असून जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.