
Makarand Patil Visit to Buldhana
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून बाधित शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पालकमंत्री पाटील यांनी चिखली तालुक्यातील केळवद, मालगणी, बेराळा, वसंतनगर व सरंबा, तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव माळ येथे शेताच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पावसातील खंड, पिकांची सद्यस्थिती, उत्पादनावर होणारा परिणाम तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती घेतली. पीक परिस्थिती व नुकसानीचा प्रशासकीय यंत्रणेकडून आढावा घेण्यात आला. त्याआधारे लवकरच मदतीबाबत निर्णय होईल, असे ना. मकरंद पाटील यांनी सांगितले.
दौऱ्यादरम्यान सिंदखेडराजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणाचीही पालकमंत्र्यांनी पाहणी केली. धरणातील सद्य पाणीपातळी, उपलब्ध पाणीसाठा तसेच सिंचनासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याची माहिती त्यांनी जाणून घेतली. पिण्याच्या पाण्याचे आवश्यक आरक्षण करून उपलब्ध पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन व आराखडा तयार करावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.