मेहकर येथील शेख सादिक शेख हारून बागवान, शेख हमीद शेख अफसर आणि अशफाक शहा यांनी २१ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. सर्वे क्र. १६/२ मधील प्राथमिक शाळेसाठी आरक्षित जमिनीबाबत सातबारा उतारे, शोध अहवाल, फेरफार नोंदी, खरेदी खत व इतर कागदपत्रांच्या आधारे नियमबाह्य व्यवहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
या प्रकरणात मेहकर नगर परिषद, नगररचना विभाग, तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय तसेच इतर संबंधित कार्यालयांकडे वेळोवेळी तक्रारी व निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही तक्रारदारांनी झाली नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. कारवाई न झाल्यास ११ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत अपर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे लेखी आश्वासन तक्रारदारांना मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण काही दिवसांसाठी स्थगित केले आहे. तक्रारदारांनी प्रशासनाला आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. चौकशीमध्ये ठोस कारवाई न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
मेहकर नगर परिषदेने सादर केलेल्या अहवालात सर्वे क्र. १६/२ मधील ३,२१४.५९ चौ. मी. क्षेत्र प्राथमिक शाळेसाठी सुविधा क्षेत्र आरक्षित म्हणून राखीव असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच या जागेचा वापर आरक्षित प्रयोजनासाठीच करणे बंधनकारक असल्याचे अहवालात नमूद आहे. आता जिल्हास्तरीय चौकशीत या आरक्षित भूखंडाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, फेरफार नोंदी, संबंधित कागदपत्रे आणि अधिकाऱ्यांची भूमिका यांची तपासणी होणार आहे. त्यामुळे चौकशीचा अहवाल काय येतो आणि दोषी आढळणाऱ्यांवर कोणती कारवाई होते, याकडे मेहकरवासीयांचे लक्ष लागले आहे.
Buldhana News: हॉर्न वाजविल्याचा राग तिघांवर जीवघेणा हल्ला; ६ जणांविरुद्ध गुन्हा; हातणी गावातील घटना



