
Washim Crime News:
या प्रकाराची माहिती शाळेतील एका शिक्षिकेला मिळाल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. मिळालेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थिनी घाबरलेल्या अवस्थेत संबंधित शिक्षिकेकडे गेल्या. त्या रडत असल्याने शिक्षिकेने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी विद्यार्थिनींनी शिक्षकाकडून झालेल्या गैरवर्तनाची माहिती दिली. शिक्षिकेने तत्काळ पालक तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली. घटना समोर आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी ग्रामस्थांनी त्याला मारहाण केल्याचेही सांगण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आणखी काही विद्यार्थिनींसोबतही अशाच प्रकारचे गैरवर्तन झाले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित विद्यार्थिनींची ओळख गोपनीय ठेवण्यात आली. वाशिम ग्रामीण पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध पोक्सो कायद्यासह विनयभंगाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
काटा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दिलीप बोरकर याच्यावर तिसरी व चौथीतील विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून तो विद्यार्थिनींना मोबाइलवर अश्लील चित्रफित दाखवत असल्याचे समोर आले आहे. अयोग्य स्पर्श करून गैरवर्तन तसेच कोणाला सांगितल्यास शाळेत येऊ न देण्याची धमकी दिल्याचा आरोपही आहे. शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
पोलिस ठाणेदार वाशिम श्रीदेवी पाटील, म्हणाले की, 66 पालकांनी पुढे येत शिक्षक दिलीप बोरकर याच्याविरोधात इनकॅमेरा माहिती दिल्याचे समोर आले आहे. कोणतीही भीती न बाळगता विद्यार्थिनीनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येणार असून, त्यामुळे आरोपीचे आणखी गैरप्रकार उघड होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी वाशिम ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Washim News: पैनगंगा नदीची पाणीपातळी घटली; रिसोडच्या मसलापेन परिसरावर दुष्काळाचे सावट