चंद्रपूर : राज्याच्या वन विभागाकडून वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला आहे. वन मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने आपल्या कलेतून हे यश संपादन केले आहे. तब्बल 65 हजाराहून अधिक रोपट्यांच्या सहाय्याने ‘भारतमाता’ हा शब्द लिहून वन विभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये मान मिळवला आहे.
राज्याच्या वन विभागाने आत्तापर्यंत चार वेळा ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये सामील होण्याचे मान मिळवला आहे. यावेळी चंद्रपूरमध्ये साकारलेल्या झाडांच्या भारतमाता या शब्दाने ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद केली आहे. यासाठी तब्बल 65 हजार 724 रोपट्यांचा वापर करण्यात आला आहे. चंद्रपूर येथे 1 मार्च ते 3 मार्च या कालावधीमध्ये ‘ताडोबा महोत्सव 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत वेगवेगळ्या प्रजातींच्या रोपट्यांपासून ‘भारतमाता’ हा शब्द लिहिण्यात आला. रामबाग येथे ही कला साकारण्यात आली. 26 प्रजातींच्या रोपट्यांनी ‘भारतमाता’ या शब्दाची निर्मिती केली आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळाले आहे.
यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, ‘आतापर्यंत वन विभागाने चार लिमका रेकॉर्ड केले. आता मात्र प्रथमच राज्याच्या वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड केला आहे. यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व वन अधिकारी, वन कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. चंद्रपुरात ६५ हजार ७२४ रोपट्यांनी लिहिलेल्या ‘ग्रीन भारतमातेचा’ संकल्प संपूर्ण जगभरात पोहचला असून ही आमच्यासाठी केवळ एक फोटो फ्रेम नसून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा महामार्ग आहे” अशा भावना वनमंत्र्यांनी व्यक्त केला.