
Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड
विशेष म्हणजे, हे काम कार्यालयाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली करण्यात आले नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. बोळधा येथे नाली बांधकामासाठी जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाकडून तांत्रिक मान्यता आदेश क्र. ०८/२०२६-२७ अन्वये २ लाख ७१ हजार रुपयांचे अंदाजपत्रक ग्रामपंचायतीला उपलब्ध करून देण्यात आले होते. या कामाची पाहणी करण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर विधाते व स्थायी अभियंता सहायक आकाश मिसाळ यांच्या पथकाने बोळधा येथे भेट दिली. (फोटो सौजन्य – AI Created)
पाहणीदरम्यान ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्याचे आढळले. त्यानंतर नाली बांधकामाची पाहणी केली असता सुमारे २५ मीटर नालीचे बांधकाम झाल्याचे दिसून आले. मात्र, नालीच्या स्लॅबची जाडी केवळ ७५ मिमी असल्याचे तसेच नालीचा सेक्शन योग्य नसल्याचे अभियंत्यांच्या निदर्शनास आले. तसेच नालीच्या समोरील मुख्य रस्ता खोदून दुसऱ्या बाजूला नाली बांधकामासाठी खोदकाम करण्यात आले होते. खोदलेला मुख्य रस्ता तात्पुरत्या स्वरुपात बुजविण्यात आल्याचे पाहणीत आढळले.
बोळधा येथील नाली बांधकामात तांत्रिक मार्गदर्शन व कामाव्या दर्गाकडे पुरेसे लक्ष दिले गेले नसल्याचे अभियंत्यांच्या पाहणीतून समोर आले आहे. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या विकासकामांमध्ये अशा त्रुटी पुन्हा होऊ नयेत. संबंधित यंत्रणेने प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि नालीचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे.- विजय बोरकर, सामाजिक कार्यकर्ते, बोळधा
या प्रकरणाचा अहवाल आवश्यक कार्यवाहीसाठी चिमूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. तसेच अहवालाच्या प्रती कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद चंद्रपूर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद चंद्रपूर यांना पाठविण्यात आल्या आहेत. आता संबंधित नालीकामाची चौकशी करून जबाबदारी निश्चित होते का आणि तांत्रिक निकषांनुसार काम पूर्ण करण्यासाठी कोणती कार्यवाही केली जाते, याकडे बोळधा ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.