
फोटो सौजन्य सोशल मीडिया
आयोवामधील मिडलटाउन येथील लष्करी दारूगोळा कारखान्यात ६८ ड्रममध्ये लेड अझाइड (Lead Azide) हे अत्यंत संवेदनशील स्फोटक साठवण्यात आले आहे. त्याचे एकूण वजन जवळपास पाच टन आहे. अनेक वर्षांच्या साठवणुकीनंतर या रसायनाची स्थिती खराब झाली असून त्यामध्ये स्फटिक तयार झाले आहेत.
त्यामुळे घर्षण किंवा धक्का लागल्यास अनियंत्रित स्फोट होण्याचा धोका वाढला आहे. हे स्फोटक दुसरीकडे हलवणेही धोकादायक असल्याने ते साठवलेल्या जागीच नियंत्रित पद्धतीने नष्ट करण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे.
या नियोजित स्फोटाला पर्यावरणवादी संघटनांनी विरोध केला होता. नागरिकांना संभाव्य धोक्याची पुरेशी माहिती देण्यात आली नाही आणि स्फोटाऐवजी इतर सुरक्षित पर्यायांचा विचार व्हायला हवा, अशी त्यांची मागणी होती. त्यानंतर अमेरिकेच्या आठव्या सर्किट अपील न्यायालयाने पर्यावरण संरक्षण संस्थेच्या आपत्कालीन परवान्याला तात्पुरती स्थगिती दिली.
सुरुवातीला २० नोव्हेंबर रोजी होणारा स्फोट २३ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई अनिश्चित काळासाठी अडकली आहे. लष्कराने मात्र स्फोटकांची स्थिती आणखी बिघडण्यापूर्वी ती नष्ट करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
नियोजित स्फोटामुळे हवेत शिशाचे विषारी कण असलेला धुराचा लोट निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान आणि वाऱ्याच्या दिशेनुसार हे कण आयोवाच्या काही भागांसह इलिनॉय राज्यापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे शेती, जनावरे, घरे आणि सार्वजनिक ठिकाणांवर विषारी धूळ साचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेषतः लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी शिशाचा संपर्क अधिक धोकादायक ठरू शकतो. स्थानिक नागरिकांना घरात राहण्याच्या आणि बाहेरील पृष्ठभाग स्वच्छ करण्याच्या सूचना देण्याची तयारीही करण्यात आली होती. आता न्यायालयाचा अंतिम निर्णय आणि लष्कराची पुढील भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.