
Chandrapur News: धाबा परिसरात मादी बिबट्या आणि पिल्लाचा वावर; 125 वनकर्मचाऱ्यांची शोधमोहीम सुरू
नागपूर ग्रामीण आरटीओमधील कथित भ्रष्टाचार! १० ते १५ कोटींच्या मासिक खंडणीचा दावा…
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शुक्रवारीच्या रात्रीपासूनच वनविभागाकडून दिवस-रात्र गस्त घालण्यात येत आहे. दरम्यान, गोंडपिंपरी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयामार्फत मध्य चांदा उपवनसंरक्षकांना निवेदन देऊन बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत वनविभागाने रविवारी सकाळपासून विशेष शोधमोहीम सुरू केली. (फोटो सौजन्य – AI Created)
मध्य चांदा वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक ए. एस. शेंडगे आणि धाबा वनपरिक्षेत्राधिकारी किशोर गौरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. चंद्रपूर व मूल येथील एसटीपीएफ पथक, बल्लारशाह व चंद्रपूर येथील आरआरई पथक, पीआरटीचे ४० कर्मचारी, धाबा वनपरिक्षेत्रातील ४० कर्मचारी, धाबा उपपोलीस ठाणेचे पोलीस कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवार तसेच शार्प शूटर फुलझेले यांचा या मोहिमेत सहभाग आहे. किरमिरी परिसरातील बिबट्याचा शोध घेणे वन कर्मचाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
परिसरात अतिशय घनदाट झुडपे असून, काही वर्षांपूर्वी झालेल्या दगड खोदकामामुळे अनेक ठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे बिबट्याचा माग काढताना कर्मचाऱ्यांना अत्यंत सावधगिरीने पुढे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी झुडपांमधून वाट काढणेही कठीण होत असून, काही भागात वन कर्मचाऱ्यांना जमिनीवर अक्षरशः लेटून व घसरत पुढे जाऊन शोध घ्यावा लागत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही वनविभागाचे कर्मचारी जीवाची पर्वा न करता बिबट्याचा शोध घेत आहेत.
कॅमेऱ्यातील नोंदीनुसार मादी बिबट्या आपल्या पिल्लासह परिसरात वावरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मादी बिबट्याला जेरबंद करण्यापूर्वी तिच्या पिल्लाचा शोध घेणे आवश्यक असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. मादी आणि पिल्लाला एकाच वेळी पकडणे शक्य नसल्याने वनविभागासमोर ही मोहीम अधिक आव्हानात्मक ठरत आहे.
बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेऱ्यांची मदत घेतली जात असून, त्याच्या संभाव्य वावराच्या ठिकाणी बारकाईने पाहणी करण्यात येत आहे.
ही मोहीम अतिशय कठीण परिस्थितीत राबवावी लागत आहे. परिसरात घनदाट झुडपे असून अनेक ठिकाणी दगड खोदकामामुळे खोल खड्डे आहेत. त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना अत्यंत सावधगिरीने शोधमोहीम राबवावी लागत आहे. मादी बिबट्या आणि पिल्लाला एकाच वेळी पकडणे शक्य नसल्याने प्रथम पिल्लाचा शोध घेऊन त्यानंतर मादी बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिस्थिती कठीण असली तरी आमचे प्रयत्न अविरत सुरू आहेत. लवकरच मादी बिबट्या आणि तिच्या पिल्लाला सुरक्षितपणे पकडण्यात आम्ही यशस्वी होऊ. तोपर्यंत नागरिकांनी सतर्कता बाळगावी. – किशोर गौरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, धाबा