शिवचातुर्य दिन (फोटो- सोशल मिडिया)
पर्यटन मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी १७ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सुटका करून स्वराज्याकडे परतण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी १७ ऑगस्ट हा दिवस ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने ‘गरुडझेप मोहीम’ पुणे येथील संस्थेच्या वतीने आग्रा ते राजगड अशी सुमारे १ हजार ३१० किलोमीटरची पायी व सायकल मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
आग्रा येथे होणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक
आग्रा येथे उत्तरप्रदेश शासन व महाराष्ट्र शासनाच्या समन्वयातून ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. याबाबत आग्रा येथील विविध तज्ज्ञांशी चर्चा केल्या आहेत. प्रकल्प संकल्पित करण्याबाबत जिल्हा प्रशासनासोबत बैठक पार पडली आहे.या स्मारकाच्या कामासाठी जागतिक किर्तीच्या प्रसिध्द वास्तुशास्त्रज्ञ आभा लांबा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण देशातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींसाठी हे स्मारक एक प्रेरणादायी स्थळ ठरेल. हे स्मारक राष्ट्रप्रेम, सर्वधर्मसमभाव आणि शौर्याचे प्रतीक ठरेल, मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचा जागर देशात सर्वत्र पोहोचण्यासाठी हे स्मारक महत्त्वपूर्ण ठरेल, तसेच गरुडझेप संस्थेमार्फत दरवर्षी शिवचातुर्य मोहिमेचे आयोजनही करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे यांनी सांगितले.
गरुडझेप संस्थेमार्फत गेल्या सात वर्षापासून शिवचातुर्य मोहिमेचे आयोजन
गरुडझेप संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मारुती गोळे यांच्या संकल्पनेतून गेल्या सात वर्षांपासून ‘आग्रा ते राजगड गडदुर्ग मोहीम’ आयोजित करण्यात येत आहे. ही मोहीम केवळ दुर्गभ्रमंतीपुरती मर्यादित नसून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, स्वराज्याची प्रेरणा, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संवर्धन आणि व्यसनमुक्त भारताचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहे. या मोहिमेत सुमारे २,२०० मावळे, तसेच ६० सायकलस्वार सहभागी आहेत., उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या चार राज्यांमधून तसेच सुमारे ७८ शहरांमधून ही मोहीम मार्गक्रमण करणार आहे. आग्रा येथून सुरू झालेला हा ऐतिहासिक प्रवास ग्वाल्हेर, शिवपुरी, गुना, पाचोर, देवास, तिखरी, सेंधवा, धुळे, चांदवड, संगमनेर, भोसरी मार्गे राजगड येथे पोहोचणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेच्या घटनेचे ऐतिहासिक महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. ‘गरुडझेप मोहीम’ ही केवळ प्रवासाची मोहीम नसून, इतिहास, शौर्य, स्वराज्याची प्रेरणा आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे, मोहिमेच्या समारोपावेळी राजगड येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा आणि स्वराज्याच्या इतिहासाचा जागर करण्यात येणार आहे.
‘शिवचातुर्य दिना’निमित्त आग्रा येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
‘शिवचातुर्य दिना’निमित्त आग्रा येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ऐतिहासिक घटना जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष टपाल आवरणाचे प्रकाशनही करण्यात आले आहे. या उपक्रमाला विविध संस्था, प्रशासन आणि नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.या मोहिमेच्या निमित्ताने आग्रा येथील ऐतिहासिक सातवंती किल्ल्याच्या विहिरीतील पवित्र जल विशेष विधीपूर्वक संकलित करून आग्रा किल्ल्यासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर जलाभिषेक करण्यात आला. गोमंतकातील ऐतिहासिक वारशाचे पवित्र जल शिवरायांच्या चरणी समर्पित करून गोवा व महाराष्ट्र यांच्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नाते अधिक दृढ करण्याचाही उपक्रम यामाध्यमातून राबविण्यात येत आहे.
अवघ्या 20 महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला गळती; 2 कोटींच्या कामावर प्रश्नचिन्ह
यावेळी गोव्यातील ५० महिला कलाकार ‘शिवशौर्य’ या ऐतिहासिक नाट्याविष्काराद्वारे शिवकालीन पराक्रम, जिजाऊंचे संस्कार आणि स्वराज्याची प्रेरणादायी गाथा सादर करण्यात आली. या कार्यक्रमात गोव्यातील ५० महिला कलाकारांचा ‘शिवशौर्य’ ऐतिहासिक नाट्यप्रयोग, प्रसिद्ध कलाकार सायली जोशी गोडबोले यांचे ‘राष्ट्रमाता जिजाऊ’ या विषयावरील एकपात्री नाटक, प्रसिद्ध हलगीवादक विनायक सोनावणे यांचे पारंपरिक हलगी वादन तसेच कराड येथील हिंदू तेज संस्थेकडून शिवकालीन युद्धकला, दांडपट्टा आणि शौर्यप्रात्यक्षिके सादर करण्यात आली आहेत. शिवचातुर्य दिन व गरुडझेप मोहीम फ्लॅग ऑफ १७ ऑगस्ट २०२६ (सोमवार) रोजी आग्रा किल्ला परिसर, आग्रा येथे सकाळी ८.०० वा पार पडले.