(Photo - Social Media)
राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांना वेग आला असून आता बस स्थानकांवरील कँटीनही प्रशासनाच्या रडारवर आली आहेत. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड एसटी बस डेपोतील कँटीनवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यानंतर कँटीनचा परवाना निलंबित करून ते बंद करण्यात आले.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विभागाच्या कारवायांना वेग आल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी कारवाईचा मोर्चा चायनीज स्टॉल्ससह विविध खाद्यपदार्थ विक्री केंद्रांकडे वळवण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर बस स्थानकांवरील कँटीनची तपासणीही सुरू झाली आहे.
‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत झालेल्या तपासणीत कँटीनमध्ये स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे आढळले. फरशी आणि स्वयंपाकघर अस्वच्छ असल्यासोबतच भिंतींचे पापुद्रे निघालेले होते. खिडक्यांना आवश्यक जाळ्या नसल्याचेही तपासणीत समोर आले.
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’
पाण्याच्या तपासणीचा अहवाल उपलब्ध नसल्याचे आढळले. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी झालेली नव्हती. त्यांच्याकडे ॲप्रोन आणि हातमोजेही नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
याशिवाय खाद्यपदार्थांच्या खरेदीचे रेकॉर्ड अपूर्ण होते. चणाडाळीच्या साठ्याबाबत आवश्यक नोंदी, साफसफाईची माहिती आणि कीटक नियंत्रणाशी संबंधित रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचेही आढळले. या गंभीर त्रुटींमुळे प्रशासनाने कँटीनचा परवाना निलंबित करून ते बंद केले.
दरम्यान, अन्न भेसळीविरोधातील कारवायांना अधिक कडक करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. विशेषतः दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सूचना त्यांनी अन्न व औषध प्रशासनाला केली.
नागरिकांच्या आरोग्याशी, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात संघटित गुन्हेगारीच्या तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
सिल्लोडमधील कारवाईनंतर राज्यातील इतर बस स्थानकांवरील कँटीनच्या स्वच्छता आणि अन्न सुरक्षा व्यवस्थेकडेही प्रशासनाचे लक्ष जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्येही आता सतर्कता वाढली आहे.






