
Chhatrapati Sambhajinagar, Maratha Reservation
जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या माहितीनुसार, जिल्ह्यात अशा नोंदींची संख्या ५,११३ आहे. या सर्व नोंदी नागरिकांना पाहता याव्यात यासाठी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर त्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना या याद्या पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मराठा आरक्षण उपसमितीने प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर त्या-त्या गावातील उपलब्ध नोंदींच्या याद्या प्रदर्शित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांना आपल्या गावातील जुन्या दस्तऐवजांमध्ये कोणत्या नोंदी आढळल्या आहेत, याची माहिती स्थानिक पातळीवरच मिळणार आहे.
जिल्ह्यात ‘मराठा’, ‘मराठा-कुणबी’ आणि ‘कुणबी-मराठा’ अशा विविध नोंदी जुन्या दस्तऐवजांमध्ये आढळून आल्या आहेत. या नोंदी आणि त्यांच्याशी संबंधित कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
प्रत्येक जिल्ह्यात मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना संबंधित याद्या उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ऑनलाइन बैठकीत दिले आहेत. या शिबिरांमधून नागरिकांना जुन्या नोंदींची माहिती पाहण्याची तसेच संबंधित प्रक्रियेबाबत मार्गदर्शन मिळण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
दरम्यान, पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी योग्य कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हानिहाय दौरा सुरू होत आहे. समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हानिहाय बैठका घेण्यात येणार असून, संबंधित जिल्ह्यांमधील कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे.
Easy Hacks: फोडलेला नारळ किती दिवस टिकतो? खोबर खराब होऊ नये म्हणून ‘या’ पद्धतीने करून ठेवा स्टोर
८ सप्टेंबर : छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली
९ सप्टेंबर : नांदेड आणि लातूर
१० सप्टेंबर : धाराशिव आणि बीड
या बैठकांमध्ये जुन्या नोंदींचे संकलन, पडताळणी आणि पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेबाबत आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे मराठा-कुणबी नोंदी आणि जात प्रमाणपत्र प्रक्रियेच्या दृष्टीने या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी २०० कोटींचा निधी
राज्य सरकारने डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात EBC, EWS आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सारथीच्या परदेशी शिष्यवृत्ती धोरणात मोठे बदल
राज्य सरकारच्या नव्या धोरणानुसार, विद्यार्थ्यांच्या परदेशातील विद्यापीठाची शिक्षण फी थेट संबंधित विद्यापीठाला अदा केली जाणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या रकमेवरील कमाल मर्यादा हटवण्यात आली आहे.
मराठा विद्यार्थ्यांना OBC प्रमाणे शैक्षणिक सवलती
तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE) राज्यातील सर्व विभागीय कार्यालये आणि विद्यापीठांना यांसबंधीचे निर्देश दिले आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इतर मागास वर्ग (OBC) प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलती दिल्या जाणार.
१,४४० तरुणांना मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण
दरम्यान, सारथी संस्थेने IDTRS, पिंपरी-चिंचवड यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत १,४४० मराठा आणि कुणबी तरुणांना मोफत वाहनचालक आणि कंडक्टर प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामध्ये LMV आणि HMV ड्रायव्हिंग तसेच कंडक्टर प्रशिक्षणाचा समावेश आहे.