
Chhatrapati Sambhajinagar Airport (Photo Credit - X)
सध्या चिकलठाणा विमानतळाची धावपट्टी मोठ्या क्षमतेच्या विमानांसाठी अपुरी ठरत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तसेच मोठ्या देशांतर्गत विमानांची वाहतूक वाढविण्याच्या दृष्टीने धावपट्टी लांब करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या प्रकल्पासाठी तब्बल १३९ एकर जमीन आवश्यक असून, त्यासाठी मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पात ७३४ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
भूसंपादन प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून ८ जानेवारी २०२५ रोजी कलम ११ (१) अंतर्गत प्रारंभिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर शेतकऱ्यांकडून आलेले आक्षेप व हरकती ऐकून त्यावर निर्णय घेण्यात आला. दरम्यान, विमानतळ प्राधिकरणाकडून संपादन क्षेत्रात काही तांत्रिक बदल सुचविण्यात आले. त्यानुसार काही जमीन वगळण्यात आली, तर काही नवीन क्षेत्र समाविष्ट करण्यात आले.
अंतिम अधिसूचना जाहीर झाल्यानंतर आता पुढील टप्यात संपादनात येणाऱ्या प्रत्येक शेतक-याला वैयक्तिक स्वरूपाची कलम २१ (१) अंतर्गत नोटीस बजावली जाणार आहे. या नोटीसनंतरही शेतकऱ्याऱ्यांना आक्षेप नोंदविण्याची संधी देण्यात येणार असून, त्यावर सुनावणी घेतली जाईल, सुनावण्या पूर्ण झाल्यानंतर प्रारूप निवाडा तयार करून राज्य शासनाकडे निधीची मागणी केली जाणार आहे.
शासनाकडून निधी प्राप्त होताच अंतिम निवाडा जाहीर करण्यात येणार असून, ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. आतापर्यंत २१७ कोटी रुपयांचा निधी प्रशासनाला प्राप्त झाल्याची माहिती भूसंपादन अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी दिली.