४५ मिनिटांचा प्रवास केवळ १५ मिनिटांत! मराठवाडा-खान्देश कनेक्टिव्हिटीसाठी नितीन गडकरींचा मोठा निर्णय (Photo Credit- X)
सध्या औट्रम घाटातून खान्देशात जाण्यासाठी प्रवाशांना २८ पेक्षा अधिक तीव्र आणि जीवघेणी वळणे पार करावी लागतात. दरड कोसळण्याची भीती आणि सततच्या वाहतूक कोंडीमुळे हा घाट पार करण्यासाठी किमान दीड तास (९० मिनिटे) लागतो. मात्र, नवीन प्रस्तावित बोगद्यामुळे हे अंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. २०२६ च्या अखेरीस या प्रकल्पाच्या कामात मोठी प्रगती दिसेल, असे संकेत मिळत आहेत.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. गौताळा अभयारण्यामुळे हा प्रकल्प पर्यावरण आणि वन्यजीव मंत्रालयाच्या परवानग्यांमध्ये अडकला होता. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष बैठक घेऊन यातील तांत्रिक अडचणी दूर केल्या. वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यावरणाचा समतोल राखून डोंगर पोखरून बोगदा करण्याचा पर्याय निवडण्यात आला आहे.
या प्रकल्पावर सुमारे १२,४३५ ते १२,६०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
दुहेरी बोगदा: ५.५ किमी लांबीचा हा दुहेरी बोगदा असेल, ज्यात येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग असतील.
वेगवान प्रवास: बोगद्यामध्ये ताशी १०० किमी वेगाने वाहन चालवण्याची परवानगी असेल.
अत्याधुनिक यंत्रणा: आपत्कालीन बाहेर पडण्यासाठी मार्ग (Escape route) आणि स्वयंचलित आग विझवण्याची यंत्रणा (Fire Fighting System) यात असेल.
इंधन बचत: घाटातील वळणे कमी झाल्यामुळे वाहनांच्या इंधनाची मोठी बचत होईल आणि वाहनांची झीजही कमी होईल.
हा मार्ग गौताळा औट्रम घाट वन्यजीव अभयारण्यातून जात असल्याने पर्यावरणाची विशेष काळजी घेण्यात आली आहे. रस्ता रुंदीकरण केल्यास मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली असती, ती टाळण्यासाठी बोगद्याचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. यामुळे वन्यजीवांच्या मुक्त संचाराला कोणताही अडथळा येणार नाही.
हा बोगदा उत्तर बाजूने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव (बोधरे परिसर) आणि दक्षिण बाजूने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड (तलवाडा फाटा) यांना थेट जोडेल. यामुळे कन्नड शहरातील अवजड वाहतूक कमी होऊन शहरातील अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होईल. हा प्रकल्प केवळ रस्ता नसून मराठवाडा आणि खान्देशच्या आर्थिक विकासाचा ‘कणा’ ठरणार आहे. उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या मालवाहतुकीसाठी देखील हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.






