प्रकल्पांची तळाकडे वाटचाल : मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईची शक्यता
महिनाभरापासून उन्हाचा तडाखा सुरु आहे. एकीकडे नागरिकांना उष्णतेचा त्रास होतो आहे तर दुसरीकडे बाष्पीभवनाचा फटका पडत असल्याने धरणांची पाणीपातळी झपाट्याने खाली येत आहे. सध्या सर्व जिल्ह्यांत तापमान चाळीशीपुढे सरकून ४५ अंशाच्या दिशेने कूच करत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मंगळवार, २९ रोजी या हंगामातील विक्रीम ४२.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
मोरबे धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; दमछाक झाली अन्…
पुढील काही दिवसात तीव्र उष्णतेच्या लाटा धडकणार आहेत. वाढते तापमान आणि पाणी टंचाईने नागरिक हवालदिल झाले आहेत. याचा फटका धरणांनाही बसत आहे. जायकवाडीसह छोट्या-मोठ्या प्रकल्पांतील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. परिणामी पाळीपातळी खाली खाली येत आहे. यातील अनेक धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे.
विभागात प्रमुख ११ मोठ्या धरणांमध्ये आजघडीला ५० टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. तर ७५ मध्यम प्रकल्पात अवघा ९.१२ टक्के आणि ७५१ लघु प्रकल्पांत २३.१८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात २६.२७ टक्के पाणीसाठा तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ प्रकल्पांमध्ये ८९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विभागातील एकूण ८७९ प्रकल्पांमध्ये ३८.८९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या विभागांत तीव्र पाणीटंचाई सुरु झाली आहे.
पिकांसह फळबागा संकटात
पाणी टंचाईमुळे विभागातील फळबागा संकटात आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात मोसंबीचे सर्वाधिक क्षेत्र आहे. वाढत्या तापमानामुळे झाडांची पाण्याची गरज वाढली आहे. पुरेसे पाणी नसल्यामुळे फळबागा जगविण्याचा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान राबविण्यात येत आहे. शासकीय पातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तंत्रज्ञान आणि पाण्याचा काळजीपूर्वक वापर केल्यास कमी पाण्यात फळबागा वाचविण्यास मदत होते, असे हिमायत बाग फळ संशोधन केंद्राचे संचालक शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी म्हटले आहे.
राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला; वाशिममध्ये तापमान 43 अंशांवर
प्रकल्पनिहाय उपलब्ध पाणीसाठा
जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्पात जेमतेम साठा आहे. सुखना धरणात १० टक्के पाणीसाठा आहे. लाहुकी ३, टेंभापुरी ८२, ढेकू ६, कोल्ही ५२, नारंगी ३३, गिरजा ३०, अंबाडी २४, गडदगड २९, पूर्णा नेवपूर २६, अंजना पळशी ६३, शिवना टाकळी ३२, खेळणा १९ आणि अजिंठा अंधारी १५ टक्के असा धरणनिहाय पाणीसाठा आहे. बोरदहेगाव आणि वाकोद धरण कोरडे आहे. वेगाने पाण्याचे बाष्पीभवन होत असल्यामुळे आतापासूनच मोठी चिंता पडली आहे. त्यामुळे आगामी काळात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.