राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला; वाशिममध्ये तापमान 43 अंशांवर
वाशिम : यंदाच्या हंगामात उन्हाचा पारा चांगलाच वर जात आहे. सध्या सरासरी 43 अंशांपर्यंत पाऱ्याने मजल मारली आहे. गेल्या 2-3 दिवसांमध्ये तर उन्हाचा कहरच पाहायला मिळत आहे. मंगळवारी (दि. 29) सकाळपासून उन्हसावलीचा खेळ सुरू होता. तरीही वातावरणात कमालीची उष्णता होती.
सकाळपासूनच सूर्याचा प्रकोप पाहिला मिळत आहे. आकाशात अधूनमधून ढगांची गर्दीही असल्याने सावलीनेही किंचित दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तळपत्या उन्हापुढे हा दिलासा फोल ठरत होता. दुपारी सर्वोच्च तापमान अनुभवण्यास मिळत आहे. दुपारी 4.30 वाजेपर्यंत उन्ह कायम राहते. तर रात्री 9 वाजेपर्यंत उष्ण वाऱ्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला. यंदा मार्चमध्ये तापमानवाढीला सुरुवात होऊन एप्रिलमध्ये पाऱ्याने उच्चांक गाठायला सुरुवात केली. एप्रिलचे 21 दिवस तापमान चांगलेच वर राहिले.
सध्या तर उन्हामुळे बाहेर पडणेही कठीण होत आहे. यंदाच्या हंगामात एप्रिलमध्ये 22 दिवस पारा चांगलाच तापला होता. मार्चमध्येदेखील सरासरीच्या तुलनेत तापमान जास्तच आहे.
अवकाळीची शक्यता
वाढता उकाडा पावसासाठी पोषक ठरत आहे. सूर्य जसजसा उत्तरेकडे सरकतो, तशी तापमानातही वाढ होते. मे महिन्यात यात आणखी वाढ अपेक्षित आहे. मान्सूनच्या आगमनासाठी ही स्थिती पोषक मानली जात आहे. त्यामुळे वेळेत व चांगला पाऊस घेऊन येण्यासाठी ही स्थिती फायदेशीर ठरणार असल्याचा अंदाजही अभ्यासक वर्तवत आहे.