
सावधान! संभाजीनगरात मतदानाच्या दिवशी पोलिसांची करडी नजर (Photo Credit-X)
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरात आतापर्यंत ९०५ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी म.दा.का.नुसार ८८ कारवाया, तर महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार २८ व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. एमपीडीए अंतर्गत चार आरोपींना स्थानबद्ध, तर मकोका अंतर्गत तीन आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
अवैध दारूविक्री आणि अमली पदार्थाच्या व्यवहारावर करडी नजर ठेवण्यात येत असून, दारूबंदी अंतर्गत २११ गुन्हे दाखल करून ७ लाख २१ हजार ८९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच एनडीपीएस कायद्यानुसार १८ गुन्हे दाखल करून ११ लाख ८७ हजार २०७ रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
मतदानासाठी ४ हजार ६६७ पोलिस अधिकारी व अंमलदार १ हजार ९२८ होमगार्ड, तसेच राज्य राखीव पोलिस दलाची एक कंपनी व दोन प्लाटून तैनात करण्यात आले आहेत. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात तसेच अतिसंवेदनशील व संवेदनशील भागात फिक्स पॉइंट बंदोबस्त, पायी पेट्रोलिंग, सेक्टर पेट्रोलिंग राबविण्यात येत आहे.