
छत्रपती संभाजीनगरमध्ये डेंग्यूचा धोका कायम! (Photo Credit - X)
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): पावसाळा लांबल्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने याची दखल घेत ३ नोव्हेंबरपासून शहरभर व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असते. यंदा पावसाळा अधिक काळ टिकल्याने डेंग्यूच्या प्रकरणांत हळूहळू वाढ होत आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते २८ ऑक्टोबरदरम्यान शहरात एकूण ६३४ संशयित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ७० रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच महापालिकेच्या आरोग्य व मलेरिया विभागाने एकत्रितपणे शहरात प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत सर्व झोन कार्यालयांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी धूर फवारणी, औषध फवारणी, तसेच पाण्याचे डबके साचलेल्या ठिकाणी खराब ऑईल टाकण्याची कार्यवाही केली.
अवकाळीचा डबल फटका! एकीकडे पाऊस, दुसरीकडे मजुरांची टंचाई; शेतमाल वाया जाण्याची भीती
नागरिकांच्या घरांचे सर्वेक्षण करून पाणी साठ्यांची तपासणी करण्यात आली आणि डासांच्या अळ्या नष्ट करण्यात आल्या. संपूर्ण पावसाळ्यात तीन टप्प्यांत ही मोहीम राबविण्यात आली, ज्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार पसरण्यापासून आळा बसला, मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा डेंग्यूचे प्रमाण तुलनेने कमी राहिल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
पावसाळा लांबल्यामुळे डेंग्यू, मलेरिया व इतर आजारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे महापालिकेच्या मलेरिया आणि आरोग्य विभागामार्फत ३ नोव्हेंबरपासून विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. या मोहिमेत धूर फवारणी, औषध फवारणी, अॅबेट ट्रीटमेंट आणि परिसर स्वच्छतेचे उपक्रम राबविले जाणार आहेत.
जून-जुलै महिन्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी ऑगस्टपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे डेंग्यूच्या संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे, ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस कायम असल्याने पुढील काही दिवसांत रुग्णसंख्या आणखी वाढू शकते, अशी शक्यता डॉ. सुमथ्या नाइझ यांनी व्याक्त केली, त्या म्हाणाल्या, नागरिकांनी स्वतःच्य परिसरात स्वछता राखावी, जणी साधू देऊ नये आणि डास वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊ नये, याची विशेष खबरदारी घ्यावी.