अवकाळीचा डबल फटका! एकीकडे पाऊस, दुसरीकडे मजुरांची टंचाई (Photo Credit - X)
बनकिन्होळा (सिल्लोड): सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा, बाभूळगाव बु., भायगाव, चिंचखेडा, वरखेडी कायगाव, गेवराई सेमी, केन्हाळा, भवन, आदी परिसरांमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रात्रंदिवस अवकाळी पाऊस पडत आहे. मंगळवारी (दि. २८) देखील पाऊस झाला, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतात मका आणि सोयाबीनची सोंगणी करून ठेवलेली आहे. मात्र, पाऊस उघडत नसल्याने हा सर्व माल शेतातच पडून आहे. तसेच ‘पांढरे सोने’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेचणीला आलेल्या कापसाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
सध्या तालुक्यात अनेक ठिकाणी मका, सोयाबीन सोंगणी आणि कापूस वेचणीचे काम सुरू आहे. सततच्या पावसामुळे सोंगणी केलेली सोयाबीन आणि मका पूर्णपणे भिजून काळी पडू लागली आहे. काही शेतकऱ्यांनी जमा करून ठेवलेली सोयाबीनची सुडी आणि मकादेखील वाळत नसल्याने वाया जात आहे.
सोयाबीन आणि मक्याला सध्या बाजारात कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आधीच अडचणीत आहेत. त्यातच सतत पाऊस आणि सूर्यदर्शन मिळत नसल्यामुळे शेतमाल खराब होत आहे. अवकाळी पावसामुळे आधीच शेतीत खर्च वाढला आहे. त्यातच मका, सोयाबीन आणि कापसाचे मोठे नुकसान झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यंदा दिवाळीचा सणही साजरा केला नाही.
पावसामुळे वेचणीला आलेला कापूस ओला होऊन त्याच्या वाती झाल्या असून, कापूस काळवंडला आहे. परिणामी, कापसाची गुणवत्ता घसरल्याने बाजारात त्याला योग्य दर मिळत नाहीये. व्यापारीही कमी भाव देत असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मजुरी, खत आणि औषधांचे दर वाढले, पण अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची सर्व मेहनत वाया गेली आहे, अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.






